Raj Thackeray on Election Results: विधानसभा निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रभर सन्नाटा पसरला. लोकांनाच हा निर्णय कळला नाही, पचला नाही. माझ्याकडे संघ परिवाराशी संबंधित एक व्यक्ती आली होती, ते म्हणाले 'इतना सन्नाटा क्यो है भाई, कोई तो जिता होगा... कोणीतरी जिंकलं ना मग जल्लोष का नाही? काही काही गोष्टींवर विश्वासच बसू शकत नाही. आमचे राजू पाटील, त्यांचे गाव आहे तिथे १४०० मतदार आहेत, दरवेळी त्यांना तिथे मतदान होते. त्या गावातून राजू पाटलांना एकही मत पडले नाही. अख्ख्या गावातून एक मत पडत नाही. निकालानंतर सन्नाटा हे कसलं द्योतक असा घणाघात करत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक निकालांवर भाष्य केले आहे.
वरळी येथे मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. त्यावेळी राज ठाकरे बोलले की, मराठवाड्यातील आपला पदाधिकारी, तो तिथे नगरसेवक आहे. नगरसेवक झाला तेव्हा त्याला त्याच्या भागातून ५५०० मते आहेत. आता तो विधानसभेला उभा होता, त्याला विधानसभेला अडीच हजार मतदान झाले. निवडून आलेल्यांना विश्वास बसत नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सात वेळा आमदार झाले. दरवेळी ७०-८० हजार मतांनी निवडून यायचे ते या निवडणुकीत १० हजार मतांनी पराभूत होतात? तुम्ही म्हणाल राज ठाकरेंचा पराभव झाला, म्हणून बोलतोय.. मीच काय असं संपूर्ण महाराष्ट्र बोलतोय. भाजपाला १३२ जागा मिळाल्या, मागील वेळी १०५ मिळाल्या होत्या. २०१४ साली १२२ जागा होत्या. भाजपाचं समजू शकतो, पण अजित पवारांना ४२ जागा कुणाचा तरी विश्वास बसेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्याशिवाय जे इतके वर्ष राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावर हे लोकं मोठे झाले त्या शरद पवारांना फक्त १० जागा मिळतात. या सर्व न समजण्यासारख्या गोष्टी आहेत. ४ महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक झाली त्यात सर्वाधिक काँग्रेसचे १३ खासदार निवडून आले. एका खासदाराच्या मतदारसंघात ६ आमदार असतात. त्यांचे फक्त १५ आमदार येतात. शरद पवारांचे ८ खासदार निवडून आले, त्यांचे १० आमदार येतात. लोकसभेला ज्या अजित पवारांचा १ खासदार निवडून आला त्यांचे ४२ आमदार येतात. काय झाले, कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे. लोकांनी आपल्याला मतदान केले आहे फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही असा आरोप राज ठाकरेंनी केला.
दरम्यान, या मतदानावर जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, पण ते मतदान कुठेतरी गायब झालं. अशाप्रकारे निवडणुका लढवल्या जाणार असतील तर निवडणुका लढवायच्या कशा? हे पण निघून जाईल अर्थात. कोणीच अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. आजपर्यंत पक्षाने जी कामं केली, आंदोलनं केली, ते तुम्ही महाराष्ट्र सैनिकांनी लोकांसमोर मांडलं पाहिजे. तुम्हाला लोकांनी प्रश्न विचारले तर भांबावून जाऊ नका. जाणीवपूर्वक अपप्रचार सुरु असतो त्याला खंबीरपणे उत्तर दिलं पाहिजे. अनेक पत्रकार काही नेत्यांच्या दावणीला बांधले गेलेत. त्यांना उत्तर द्या. हा जाणीवपूर्वक केलेला प्रचार आणि प्रसार असतो, अनेक पत्रकार पक्षाच्या दावणीला बांधलेले असतात. ते चॅनेलमधून, वर्तमानपत्रातून काही गोष्टी पसरवत असतात. त्यात राज ठाकरे भूमिका बदलतात हे सातत्याने बिंबवले जाते असं सांगत राज यांनी आतापर्यंतचा अनेक राजकीय पक्षांचा इतिहास सांगितला.
छावा सिनेमा पाहायला हवा
परवा छत्रपती संभाजी महाराजांवर सिनेमा करणारे दिग्दर्शक लक्षण उतेकर भेटून गेले. हा सिनेमा खरंच पहा कारण छत्रपती शिवाजी महाराज ही आपली प्रेरणा आहे तर छत्रपती संभाजी महाराज हे आपलं बलिदान आहे. या सिनेमात संभाजी महाराज लेझीम खेळताना दाखवलेत त्यावरून वाद सुरु होता असं मला कळलं. मी दिग्दर्शकांना विचारलं की त्या लेझीम नृत्याने सिनेमा पुढे सरकत नाहीये ना, मग काढून टाका. संभाजी महाराजांवर औरंगजेबाने जे अत्याचार केले ते लोकं बघायला जाणार. लोकांच्या मनात ज्या प्रतिमा असतात तसं दाखवावं असं राज ठाकरेंनी सांगितले.