आप्पासाहेब पाटील, ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २१ - शांतता, संयम, माणसुकीचे, एकतेचे, एकजुटीचे दर्शन घडवित व अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणातील घटनेचा निषेध नोंदवित सकल मराठा समाजाचा शिस्तबध्द, संस्मरणीय ना भूतो, न भविष्यती असा नि:शब्द मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़
कोपर्डी बलात्काराच्या निषेधासाठी व मराठा समाजाच्या अन्य मागण्यासाठी सोलापूर शहरात बुधवारी सकाळी पुणा नाका येथील संभाजी चौकापासून जिजाऊ वंदना करून मूकमोर्चास प्रारंभ झाला़ संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा शिवाजी चौकाकडे मार्गस्थ झाला़ शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा होम मैदानाकडे मार्गस्थ झाला़ या मोर्चात मोहोळ, पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, माळशिरस, दक्षिण सोलापूर, करमाळा, सांगोला, माढा आदी तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते़. या मोर्चात इतर समाज बांधवाचाही सहभाग लक्षणीय होता़ या मोर्चात साधारण : १० लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते असा अंदाज वर्तविण्यात येत होता. शिस्त, स्फूर्ती आणि काटेकोर नियोजन या मोर्चाचे खास वैशिष्टये होते़ जुना पुना येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रारंभ झालेला मुकमोर्चा होम मैदानावर आला.
काय होत्या मोर्चातील मागण्या़ :
कोपर्डी घटनेतील आरोपींना तात्काळ फाशी द्यावी़
अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यामध्ये दुरूस्ती करावी़
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारावे़
होम मैदान खचाखच भरले
जुना पुना नाका येथील संभाजी चौकातून निघालेला मुकमोर्चा होम मैदानावर येऊन थांबणार होता़ त्यामुळे पहाटेपासून होम मैदानावर मराठा समाज बांधवांनी गर्दी करण्यास सुरूवात केली होती़ या मैदानावर महिलांबरोबर पुरूषांचीही वेगळी व्यवस्था केली होती़ मनपाच्यावतीने याठिकाणी पिण्याच्या पाण्याबरोबर आरोग्याच्याही सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या़ या होम मैदानावर महिलांनी काळ्या साड्या तर युवतींनी काळा पोशाख परिधान केला होता़ यात महाविद्यालयीन विद्यार्थी, डॉक्टर, व्यापारी, उद्योजक, अधिकारी, कामगार, वकील, शिक्षक आदी वर्गातील लोक सहभागी झाले होते़.
या मोर्चात येणाºया लाखो समाजबांधवाच्या मदतीसाठी विविध संस्था, संघटनांनी मदतीचा हात पुढे केला़ पार्क चौकात मुस्लिम समाज संघटनेच्यावतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती़ शिवाय अन्य संस्था, संघटनांनी अल्पोपहारासोबत पाण्याची व्यवस्था केली होती.