ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 12 - सर्वसामान्यांप्रमाणे भावना व्यक्त करता येत नसल्या तरी त्या आठ जणांनी जिद्द सोडली नाही... मुकबधिर म्हणून लोकांकडून होत असलेल्या दुजाभावातूनच प्रेरणा घेत राख्या बनविण्याचे ठरविले अन् या राख्यांच्या रेशीमगाठी थेट सातासमुद्रापार जुळून आल्या. त्यांनी बनविलेल्या ३०० राख्या अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांसाठी पाठविल्या जाणार आहेत.मूकबधिर म्हटले की त्यांच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले जाते. त्यांच्या क्षमता, कौशल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येते. व्यवसाय, नोकरी करण्यात अनेक अडथळे येतात. त्यामुळे त्यांच्यातील उमेदही कमी होते. पण पुण्यातील सहकारनगर येथे राहणारा विनित कुलकर्णी व त्याचे सात सहकारी मित्र याला अपवाद ठरले. समाजातील अनेकांकडून नाकारले जात असताना त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्याची धडपड सुरू केली आहे. मागील वर्षीपासून या आठजणांनी राख्या बनविण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला आहे. ही कल्पना विनितची असली तरी सागर यादव, अरबाज शेख, तुषार जाधव, सौरभ बिराजदार, अनिल पराते, चिन्मय लेले आणि महेश मोहिते या सात जणांनी त्याला खंबीरपणे साथ दिली आहे. त्यांनी ह्यबिझी ब्रेन आयडिया न्यु असोसिएशनह्ण असे नावही आपल्या ग्रुपला दिले आहे. अमेरिकेत राहणारे पराग वाळवे यांना विनितच्या या व्यवसायाची माहिती मिळाली. या आठ जणांच्या कल्पनेला सलाम करीत त्यांनी तेथील महाराष्ट्र मंडळातील सदस्यांसाठी ३०० राख्यांची मागणी केली आहे. लवकरच या राख्या अमेरिकेला पोहचतील.विनित मागील दोन वर्षांपासून एका बाणेर येथील एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. वेब डिझायनिंग, अॅनिमेशनमध्ये त्याचा हातखंडा आहे. पण ऐकू व बोलता येत नसल्याने तिथेही त्याला इतरांप्रमाणे वेतन मिळत नाही. त्याच्याकडे नेहमी वेगळ््या भावनेने पाहिले जाते. यातून खचून न जाता विनितने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्याने इतर सर्वसामान्यांची कसलीच मदत घेतली आहे. आपल्यासारख्या इतर तरूणांना व्यवसायात सोबत घेण्याचे त्याने ठरविले. त्यानुसार जवळच्या दोन-तीन मित्रांंना ही कल्पना सांगितली. सोशल मिडियाच्या माध्यमातून इतरांपर्यंत ती पोहचवली. या प्रयत्नांना यश मिळत दहा जणांचा ग्रुप तयार झाला. यावर्षी आठ जण या ग्रुपमध्ये असून मागील वर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी वेगवेगळ््या प्रकारच्या राख्या बनविल्या आहेत. विनितच्या घराजवळच एका शेडमध्ये त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. शनिवार (दि. २० आॅगस्ट) पासून ते या शेडमध्ये राख्या विक्रीसाठी ठेवणार आहे. विनितप्रमाणेच इतर सात जणांची जिद्द पाहून त्यांचे आई-वडील व इतर कुटुंबीयही त्यांना प्रोत्साहन देत आहेत. विनितसह सहा जण नोकरी करत आहेत. तर दोघे जण शिक्षण घेत आहेत. सहा जण नोकरी करत असले तरी त्यांना अपेक्षित वेतन मिळत नाही. त्यामुळे त्यांना हा छोटासा व्यवसाय सुरू केला आहे. ते आपल्या वेतनातून बचत करत त्यासाठी खर्च करतात. मागील चार महिन्यांपासून त्यांना दर शनिवार व रविवारी काम करता १७ ते १८ हजार राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांची रचना, आकार, रंगसंगती, साहित्याची निवड हे सर्व काम या आठ जणांनीच केले आहे, असे विनितची आई शुभांगी कुलकर्णी यांनी सांगितले.
मूकबधिरांच्या राख्यांचे अमेरिकेत रेशीमबंध
By admin | Published: August 12, 2016 8:50 PM