मुंबई : राज्यातील दलित अत्याचारांच्या घटनांत वाढ होत असल्याच्या निषेधार्थ सत्यशोधक ओबीसी परिषदेतर्फे शुक्रवारी सायंकाळी चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर मूक निदर्शने करण्यात आली. ब्राम्हणी धर्मशास्त्रांच्या आहारी जाऊन ओबीसी व मराठा समाजाने अशा निषेधार्ह घटनांमध्ये सामील होऊ नये, असे आवाहनही यावेळी पत्रकांच्या माध्यमातून करण्यात आले.याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे म्हणाले, अनेक ओबीसी तरुण बुद्ध धम्माच्या वाटेवर आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडक जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमांवर दगडफेक करणे, बौद्ध तरुणांची हत्या, अस्पृश्य महिलांवर अत्याचार अशा घटना राज्यात रोज घडू लागल्या आहेत. त्यातून दंगली घडवण्याची परिस्थिती निर्माण केली जात आहे.यावेळी दलितांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलेल्या रामदेव बाबा आणि भगवान गौतम बुद्धांच्या अस्थींचे विटंबन करणार्या आमदार राम कदम यांचा परिषदेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. शिवाय शांततेचा संदेश देण्यासाठी राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये परिषदेतर्फे बुद्धजयंती मोठ्या थाटामाटत साजरी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मुंबईतील कलिना येथे १३ व १४ मे बुद्धजयंतीनिमित्त परिषदेतर्फे दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत सेवालाल यांच्या प्रतिमांची मिरवणूकही काढण्यात येणार आहे.
दलित अत्याचाराविरोधात मूक निदर्शने
By admin | Published: May 09, 2014 6:32 PM