ऑनलाइन लोकमत
क-हाड ( सातारा), दि. २८ - ‘लव्ह जिहाद’चा वाढता प्रसार तातडीनं रोखावा, या मागणीसाठी क-हाड येथे प्रांताधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयावर शनिवारी सकाळी अकस्मातपणे मूकमोर्चा काढण्यात आला. यामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
क-हाड येथील विठ्ठल चौकात सकाळी दहाच्या सुमारास हजारो आंदोलनकर्ते जमा झाले. शहरातील मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा दत्त चौकात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आंदोलनकर्त्यांनी अभिवादन केले. ‘जय भवानी.. जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर हा मोर्चा उपविभागीय पोलिस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांच्या कार्यालयावर धडकला. आंदोलनकर्त्यांची संख्या मोठी असल्याने शिवणकर यांनी कार्यालयाबाहेर येऊन निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, 'काही समाजकंटक ‘लव्ह जिहाद’ साठी तरुण मुलींना स्वत:कडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. या वर्तनामुळे अल्पवयीन मुली त्यांच्याकडे आकर्षित होत असून हे प्रकार तातडीने थांबले पाहिजेत.’
‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, राजू कदम, विष्णू पाटसकर, जितेंद्र ओसवाल, नितीन ओसवाल, दिनेश पोडवाल, एकनाथ बागडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दादा शिंगण यांनी मोर्चाचे नेतृत्त्व केले. (प्रतिनिधी)