- राजेश मडावी
चंद्रपूर : देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प परिसरात आता ‘टसर टुरिझम’ प्रकल्प सुरू होणार आहे. यासाठी वनविभागाने रेशीम संचालनालयाला एक एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात सुमारे २०० ते २५० वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने टसर रेशीम शेती करून रेशीम कोषाचे उत्पादन घेतले जाते. या व्यवसायावर शेकडो कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. महाराष्ट्रात धुळे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, यवतमाळ, नांदेड व ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ऐन, अर्जुन, जांभूळ, किंजळ, बोर आदी वृक्ष आढळतात. ताडोबा वन परिसरात तर या वृक्षांची मोठी विपुलता आहे. पूर्णत: नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऐन व अर्जुन वृक्षांवरच रेशीम व्यवसाय करता येते. ऐन व अर्जुन झाडावर टसर अळ्यांंचे संगोपन करून टसर कोष उत्पादन घेतले जाते. जून-मार्च या कालावधीत वर्षभरातून साधारणत: तीन पिके घेतली जातात. शासनाकडून आता सवलतीच्या दरात अंडीपुंज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बरीच कुटुंबे रेशीम शेतीकडे वळत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
याचा हेतू काय?ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना रेशीम कीटक संगोपन, टसर रेशीम कोष उत्पादन ते कोष कताई व रेशीम कापड निर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवता यावी आणि दर्जेदार कापड खरेदीला चालना मिळावी, हा प्रकल्पाचा हेतू आहे. त्यामुळे ताडोबा प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना रेशमी कापडही खरेदी करता येऊ शकणार आहे.
टसर टुरिझम प्रकल्पासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात आला. स्वाईल ते फेब्रिक असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यास पुन्हा ४३ लाखांचा प्रस्ताव पाठवू. - एम. बी. ढवळे, सहायक संचालक रेशीम संचालनालय, नागपूर
रेशीम संचालनालयाकडून ‘टसर टुरिझम’चा प्रस्ताव मिळाला आहे. प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन आगरझरी प्रवेशद्वाराजवळ रेशीम कापड विक्री केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.- डॉ. जितेंद्र रामगावकर, प्रकल्प संचालक ताडोबा, चंद्रपूर