Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला राज्यभरातून मोठेच खिंडार पडलेले आहे. राज्यभरातून बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाला प्रचंड समर्थन मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा करत अनेक जिल्ह्यात पदाधिकारी, नेत्यांची नेमणुका केल्या आहेत. याशिवाय शिवसेनेप्रमाणे शिंदे गटाने युवासेनेसाठीही नेमणुका केल्या आहेत. यातच शिंदे गटाच्या युवासेनेचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सभेला परवानगी मिळाली असून, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मात्र सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. यामागे शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या सिल्लोडमधील सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. सिल्लोड नगर परिषदेने ही परवानगी नाकारली आहे. विशेष म्हणजे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात ही नगर परिषद आहे. आदित्य ठाकरे यांची सिल्लोडच्या महावीर चौकात सभा होणार होती. या सभेसाठी ठाकरे गटाने रितसर नगर परिषदेकडे परवानगी मागितली. मात्र नगर परिषदेने ही परवानगी नाकारली आहे.
श्रीकांत शिंदे यांच्या सभेला दिली परवानगी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव, खासदार श्रीकांत शिंदे यांचीही सभा सिल्लोडला होणार आहे. श्रीकांत शिंदे यांची सभा झेडपी ग्राऊंडवर होणार आहे. झेडपी ग्राऊंड आणि महावीर चौक समोरासमोरच आहे. श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांची सभा एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांची सभा समोरासमोर होत असल्याने नगर परिषदेने आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे.
कधी होणार होत्या दोन्ही सभा?
आदित्य ठाकरे यांची सभा ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता भगवान महावीर चौकात होणार आहे. आदित्य ठाकरे यांचीही शिवसंवाद यात्रा आहे. तर श्रीकांत शिंदे यांचीही सभा ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. ही सभा जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात होणार आहे. आदित्य ठाकरे यांना महावीर चौका ऐवजी इतर ठिकाणी सभा घेण्याची सूचना नगर परिषदेने केली आहे. विशेष म्हणजे सिल्लोड नगर परिषद सत्तार यांच्या ताब्यात आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"