- ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 13 - राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिप, सिनियर मास्टर (40 वर्षावरील मास्टर 1 गटात) पुरुषांच्या 75 किलो वजनी गटातील स्पर्धेत ठाण्याच्या सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रा. लि. कंपनीतील कामगार संजय दाभोळकर यांनी दुसरा क्रमांक मिळवून रौप्य पदक मिळविले. या कामगिरीबद्दल कंपनी व्यवस्थापनातर्फे त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील समतानगरमधील विप्र सभागृहामध्ये 5 ते 7 ऑगस्ट 2016 रोजी या स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, बिहार, आसाम, ओरिसा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, दिल्ली आणि तामिळनाडू येथील 425 स्पर्धक या स्पध्रेत सहभागी झाले होते. दाभोळकर यांनी 40 वर्षावरील 75 किलो वजनी गटात स्कॉट 165, बेंच प्रेस 110, डेडलिफ्ट 172.5 असे एकूण 447.5 किलो वजन उचलून महाराष्ट्राला रौप्य पदक मिळवून दिले. कर्नाटकच्या चंद्रप्पा याने 465 किलो वजन उचलून प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) मिळविले. बदलापूरच्या आर्यन जीन येथे ते नियमित सराव करतात. ठाण्याच्या सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रा. लि. या कंपनीत ते रॅपलिंग विभागात कार्यरत आहेत. कंपनी व्यवस्थापन, कामगार तसेच युनियन अध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रीय कामगार संघटनेचे (इंटक) अध्यक्ष सुधाकर सावंत, सचिव कादरभाई, युनिट सचिव आनंद भोमकर आणि सर्व कमिटी पदाधिकारी यांच्याकडून मोलाचे सहकार्य मिळाल्याचे दाभोळकर यांनी सांगितले.