ऑनलाइन लोकमतऔंढा नागनाथ, दि. 27 : बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ मंदिरातील शिवलिंगाच्या गर्भगृहाला चांदीचा वर्र्ख लावण्याचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, यामध्ये ५६ किलो चांदीचा वापर झाला आहे. श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला हे काम झाल्याने गर्भगृह शोभून दिसत आहे.
औंढा नागनाथ येथे दर्शन घेण्यासाठी पुणे येथील भाविक आले होते. त्यांनी ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ मंदिराची रचना पाहून वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहून शिवलिंगाच्या गर्भागृहाला चांदीचा वर्ख लावण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने पुरोहित कृष्णा ऋषि यांच्यामार्फत या कामासाठी लागणारी चांदी व आकर्षक कलाकृती करण्याचा मानस व्यक्त केला होता.
नाव जाहीर न करण्याच्या अटीवरच या कामाला सुरूवात झाली होती. त्यानुसार सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आ.डॉ. संतोष टारफे, सचिव गजानन वाखरकर, विश्वस्त व सल्लागारांच्या उपस्थितीत हे काम हिंगोली येथील सोने-चांदीचे व्यापारी सुधीरअप्पा सराफ यांच्याकडे दिले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे ८ महिन्यांचा कालावधी लागला. गर्भगृहात काम करताना भाविकांची सतत वर्दळीमुळे वेळ लागला.
गर्भगृहातील शिवलिंगाभोवतालच्या चार खांबांना चांदीचा वर्ख लावण्यात आला. तसेच छतालासुद्धा लावण्यात आला आहे. एका खांबासाठी सुमारे १० ते १२ किलो चांदी लागली असून, संपूर्ण कामासाठी आतापर्यंत ५६ किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. लावण्यात आलेल्या वर्खावर महादेवाचा त्रिशूल, साप व आकर्षक फुलांची कलाकृतीद्वारे ठसे उमटविण्यात आले आहेत. या कामामुळे पुरातन दगडी खांबाचे एकप्रकारे जतनच होणार आहे. हे काम करण्यासाठी सुधीरअप्पा सराफ यांनी पंजाब येथील स्वर्ण मंदिराचे काम करणाऱ्या कारागिरांना बोलावून काम करून घेतले आहे.
पुढच्या टप्प्यात शिवर्लिंगाच्या छतावरील चार दगडी तंड्या व दर्शनी भागाला चांदी लावण्याचे काम करण्यात येणार असून, यासाठी भाविकांनीसुद्धा यामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. मंदिरात झालेल्या या कामामुळे गर्भागृह शोभून दिसत आहे.