तिकिटे मिळाली : निष्ठावंतांना डावलले, रा. स्व. संघात नाराजी
संदीप प्रधान - मुंबई
स्वबळावर सत्ता काबीज करण्याकरिता सिद्ध झालेल्या भारतीय जनता पार्टीने वेगवेगळ्य़ा पक्षांतून आलेल्या किमान दोन डझन आयारामांकरिता उमेदवारीचे नजराणो पेश केले आहेत. पक्षाच्या या आयात धोरणावर भाजपा व रा. स्व. संघाचे जुनेजाणते कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत.
डॉ. विजयकुमार गावित (नंदूरबार), अनिल गोटे (धुळे शहर), संजय सावकारे (भुसावळ), अतुल भोसले (कराड दक्षिण), डॉ. सुनील देशमुख (अमरावती),
डॉ. माधव किन्हाळकर (भोकर), प्रशांत बंब (गंगापूर), मंदा म्हात्रे (बेलापूर), राम कदम (घाटकोपर पश्चिम), विजय कांबळे (कुर्ला), लक्ष्मण जगताप (चिंचवड), बबनराव पाचपुते (श्रीगोंदा), अमल महाडिक (कोल्हापूर दक्षिण), अजित घोरपडे (तासगाव), आशिष देशमुख (काटोल), समीर मेघे (हिंगणा), संजय देवतळे (वरोरा), राजन तेली (सावंतवाडी), वैभव नाईक (ऐरोली), भारती लव्हेकर (वर्सोवा) अशी काही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातब्बर मंडळी भाजपाची उमेदवारी घेऊन रिंगणात उतरली आहेत.
याखेरीज शिवसेनेच्या मतदारसंघांत सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष, उप जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. अशा प्रकारे सत्ता आणण्याचा भाजपाचा हा प्रयत्न म्हणजे सुजेला बाळसे धरले असे म्हणण्यासारखा असल्याचे एका कार्यकत्र्याने सांगितले.
खोगीरभरतीवर स्वयंसेवक नाराज
अन्य पक्षांतून भाजपात येऊ पाहणा:यांना गोळवलकर गुरुजींच्या साहित्याचा अभ्यास करायला लावल्याखेरीज व त्यांची वैचारिक बैठक पक्की झाल्याखेरीज पक्षात प्रवेश देऊ नका, असा आग्रह माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांनी मुंबईतील एका सभेत धरला होता. मात्र स्वबळाच्या सत्तेची भूक वाढलेल्या भाजपाने सरसंघचालकांच्या या भूमिकेकडे कानाडोळा करून अन्य पक्षांतील खोगीरभरती केली असल्याचे मत एका संघ स्वयंसेवकाने व्यक्त केले.
आम्ही सतरंजा उचलायच्या का?
महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आली तर सध्या पक्षात आलेले हे उपरे काही काळ टिकून राहतील. मात्र दुर्दैवाने सत्ता आली नाही तर यापैकी किती जण भाजपा व संघ परिवाराच्या विचारधारेशी जोडलेले राहतील, असा सवाल केला जात आहे. केडरबेस पार्टी मासबेस झाल्याखेरीज सत्ता मिळत नाही, हे खरे असले तरी आयारामांना उमेदवारीचे नजराणो देताना आम्ही कार्यकत्र्यानी केवळ सतरंजा उचलायच्या का, असा संतप्त सवाल एका कार्यकत्र्याने केला.