महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. सध्याचं महाराष्ट्रातील सरकार स्थिर असल्याचा निकाल जाहीर झाला. मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले. तसंच उद्धव ठाकरेंनी गडबडीत राजीनामा द्यायची गरज नव्हती. त्यांनी राजीनामा दिला नसता तर आज हे सरकार बेकायदेशीर ठरवलं असतं. या निर्णयानंतर सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) ट्वीटवर अभिनेत्री सिमी गरेवालच्या (Simi Garewal) कमेंटने मात्र लक्ष वेधून घेतलं.
सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत लिहिले,"असंविधानिक, बेकायदा आणि अनैतिक. आजच्या निकालानंतर मिंधे भाजप सरकारकडे बघण्याचा हा एकच मार्ग आहे."
त्यांच्या या ट्वीटवर सिमी गरेवाल यांनी लिहिले,"काळजीचे कारण नाही. आता पुढे सगळं आमच्यावर महाराष्ट्राच्या जनतेवर अवलंबून आहे. हीच जनता मतदान करेल आणि अवैधरित्या प्रस्थापित झालेले सरकार पाडून लोकशाही पुन्हा अस्तित्वात आणेल."
सिमी गरेवाल यांच्या या कमेंटनंतर आदित्य ठाकरेंनीही त्यांचे आभार मानलेत. काल निर्णय जाहीर झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या होत्या. तसंच न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले मात्र तरी सध्याचं सरकार कायदेशीर आहे असाच शेवटी निर्णय दिला.