ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि, 26 - अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी वाशिम तहसील कार्यालयाने गॅस सिलिंडर व अन्य साहित्यांवर स्टिकर लावून जनजागृती सुरू केली आहे. दरम्यान, पदवीधर युवकांनी मतदार नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०१६ या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदणी कार्यक्रम घोषित केला आहे. यापूर्वी नोंदणी करण्यात आलेली जुनी सर्व नोंदणी व मतदार याद्या रद्द झाल्यामुळे सर्व पदवीधरांची नव्याने नोंदणी करण्यात येत आहे. अद्याप नाव नोंदणी न केलेल्या पदवीधारकांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त तथा अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे नाव नोंदणी अधिकारी जे. पी. गुप्ता व जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केले.
पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदणी नमुना १८ द्वारे ५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. १९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत हस्तलिखीत तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई, २३ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी, २३ नोव्हेंबर २०१६ ते ८ डिसेंबर २०१६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारणे, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे २६ डिसेंबर २०१६ असून ३० डिसेंबर २०१६ रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे. पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमाकरिता अमरावती विभागातील सर्व जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना सहायक मतदार नोंदणी अधिकारी व तहसीलदार यांना पदनिदेर्शीत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
नोंदणीकरिता नमुना १८ अर्ज, पदवी,पदवीका प्रमाणपत्र, रहिवासी पुरावे, छायाचित्रासहीत संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी व पदनिदेर्शीत अधिकारी यांच्याकडे ५ नोव्हेंबर २०१६ पूर्वी कार्यालयीन वेळेत जमा करावेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.