मुंबई - राज्यात २०१९ पासून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी व महायुतीच्या सरकारमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या दैनंदिन घटनांची संख्या जवळपास सारखीच होती. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीत ही बाब समोर आली.
दोन्ही सरकारमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना दररोज सरासरी १२६ घडल्या. २०२१ या कोरोनाच्या लॉकडाऊन काळात महाराष्ट्रात प्रतिदिवशी १०९ महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. जानेवारी ते जून २०२२ या काळात १२६ घटना घडल्या होत्या, तितकीच संख्या आजही आहे.
२०२० या लॉकडाऊनच्या वर्षांत महाराष्ट्रात ३१,७०१ महिलांवर अत्याचार झाले, त्याची सरासरी दररोज ८८ होती. २०२१ वर्षात अत्याचाराच्या घटनांची संख्या ३९,२६६ वर पोहोचली. याची सरासरी दररोज १०९ होती. जानेवारी ते जून २०२२ याकाळात महाविकास आघाडीच्या काळात एकूण २२,८४३ घटना घडल्या. सरासरी १२६ होती.
प्रतिदिन ११६ अत्याचार- ३० जून २०२२ रोजी महायुतीचे सरकार आले. जुलै ते डिसेंबर २०२२ या ६ महिन्यात २०,८३० घटना घडल्या. त्याची सरासरी ११६ प्रतिदिन इतकी होती.- २०२३ मध्ये २०२२ इतक्याच घटना असून, त्याची सरासरी १२६ इतकीच येते. अल्पवयीन मुलींवरचे अत्याचारामध्ये २०२१ पासून मोठी वाढ झाली.- हे गुन्हे २०१७ मध्ये ९४, २०१८ मध्ये ४८, २०१९ मध्ये ९४, २०२० मध्ये ४८ इतके होते. हा आकडा २०२१ मध्ये २४९ वर गेला. २०२२ मध्ये ही संख्या ३३२ इतकी होती.
बालिकाच लक्ष्य१८ वर्षांवरील मुलींच्या विनयभंगाच्या गुन्ह्यांची संख्या कमी झालेली दिसून येते.२०२२ मध्ये आघाडी सरकारच्या काळात १,३१७ गुन्हे नोंदले होते, ते २०२३ मध्ये १,२०८ इतके नोंदले महिलांशी संबंधित सायबर गुन्ह्यांची संख्या २०२२ मध्ये ११६ होती, ती २०२३ मध्ये ७९ इतकी खाली आली.
मुंबईत बाललैंगिक अत्याचार तुलनेने कमी- मुंबईबाबत विचार केला तर पॉक्सोच्या अंतर्गत कलम ४ आणि ६ अंतर्गत बलात्काराचे नोंदले गेलेले गुन्हे कमी झालेले आहेत.- लॉकडाऊनच्या काळात सुद्धा मुंबईत २०२० मध्ये ४४५ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली. २०२१ मध्ये हा आकडा ५२४ होता.- २०२२ मध्ये ही संख्या ६१५ वर गेली, तर २०२३ मध्ये ती कमी होऊन ५९० वर आली.