हल्लीचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत; कार्यकर्त्यांसमोर अजित पवार काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 20:27 IST2025-03-25T20:18:48+5:302025-03-25T20:27:34+5:30

आपली महायुती असल्यामुळे युतीत अंतर पडेल असे काम कुणाकडून होता कामा नये किंवा चुकीचे वक्तव्य कुणाकडून येता कामा नये असं अजितदादांनी कार्यकर्ते, नेत्यांना कानमंत्र दिला.

Since we are a Mahayuti, no one should do anything that will cause a rift in the alliance - Ajit Pawar | हल्लीचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत; कार्यकर्त्यांसमोर अजित पवार काय बोलले?

हल्लीचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत; कार्यकर्त्यांसमोर अजित पवार काय बोलले?

मुंबई -  हल्ली ज्याच्या त्याच्या पाया पडण्याची एक पद्धत सुरू झाली आहे. आपल्या आई-वडिलांच्या पहिल्यांदा पाया पडा पण तसं होत नाही, पुढाऱ्यांच्याच पाया पडताना जास्त लोक दिसतात. मात्र अलिकडे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत असं स्पष्ट विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर केले आहे. 

काँग्रेस सेवादलाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी अजित पवारांनी हे विधान केले. ते म्हणाले की, पक्षात येणाऱ्यांची जनमानसात प्रतिमा चांगली असली पाहिजे. चुकीचे काम केलेले असेल त्यावर पांघरूण घालण्यासाठी कोण येत असेल तर त्यांनी ते पहिल्यांदा डोक्यातून काढून टाकावे. मला कायदा श्रेष्ठ वाटतो आणि मी कायद्याचा आदर करतो. चुकीचे समर्थन करणार नाही. दिशाभूल करुन काम फारकाळ टिकत नाही. होणार नसेल तर काम होणार नाही हे आम्ही स्पष्ट करतो असं त्यांनी सांगितले. 

तसेच यापुढे सेवादलाचे काम जोमाने करायचे आहे. आजची पिढी सेवादलाकडे जात नाही. पण चंद्रकांत दायमा यांनी सेवादल हा आपला परिवार समजून काम केले आहे. चंद्रकांत दायमा यांचे काम एकत्रित कॉंग्रेस असताना एकदम जवळून पाहिले आहे.  सेवादलाची शिस्त कशी पुढे नेता येईल यासाठी ते काम करत आले आणि आजही ती शिस्त पुढे नेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व घटकांना घेऊन स्वराज्य निर्माण केले तसे काम आपल्या या पक्षात झाले पाहिजे. महिलांचा, वडिलधारी लोकांचा मानसन्मान ठेवला गेला पाहिजे. या कृतीने काम करा असं अजित पवारांनी सांगितले. 

दरम्यान, आपली महायुती असल्यामुळे युतीत अंतर पडेल असे काम कुणाकडून होता कामा नये किंवा चुकीचे वक्तव्य कुणाकडून येता कामा नये. पक्षाला अडचण निर्माण होईल आणि राज्यातील लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल असे वक्तव्य करु नये, भान ठेवून वक्तव्य करा. सर्वधर्मसमभावाची भूमिका आपल्या पक्षाची आहे. शिव - शाहू - फुले - आंबेडकरांच्या विचाराने सुरु असलेले हे राज्य आम्ही पुढे नेत आहोत म्हणूनच आम्ही केलेल्या कामाला त्यांचा आशीर्वाद मिळाला आहे. आता लोकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. प्रचंड बहुमताने राज्यात सत्ता आली आहे असा कानमंत्र अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. 

Web Title: Since we are a Mahayuti, no one should do anything that will cause a rift in the alliance - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.