सुरेश भटेवरा, नवी दिल्लीभारत सरकारच्या ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षणात सिक्कीम व केरळ राज्याने देशात पहिला व दुसरा क्रमांक पटकावला आहे. सिक्कीमखेरीज हिमाचल प्रदेश, मिझोरम व नागालँड ग्रामीण स्वच्छतेत आघाडीवर आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्र १५ व्या क्रमांकावर आहे. मात्र सर्वात स्वच्छ जिल्ह्याचा सन्मान महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने मिळवला असून, सातारा तिसऱ्या तर कोल्हापूर पाचव्या क्रमांकावर आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सर्वेक्षण अहवालाचे ठळक तपशील गुरूवारी जाहीर केले. पुढले सर्वेक्षण जानेवारी महिन्यात होणार आहे. केंद्र सरकारने देशातल्या ७0 जिल्ह्यांत ७0 हजारांपेक्षा अधिक घरांचे सर्वेक्षण करून हा अहवाल सादर केला. सर्वेक्षणात मुख्यत्वे ग्रामीण भागांचाच समावेश आहे. अहवालानुसार देशातले सर्वाधिक स्वच्छ राज्य सिक्कीम आहे. त्यानंतर अनुक्रमे केरळ, मिझोरम, हिमाचल प्रदेश व नागालँड यांचा क्रमांक लागतो. ग्रामीण स्वच्छतेत बंगाल १२ व्या, गुजराथ १४ व्या तर महाराष्ट्र १५ व्या क्रमांकावर आहे. देशातले सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश २६ व्या तर बिहार सर्वात शेवटच्या ३१ व्या क्रमांकावर आहे. तोमर म्हणाले, की या रँकिंगमुळे राज्यांत व जिल्ह्यामध्ये स्वच्छतेची स्पर्धा वाढेल व जनतेत जागरूकता निर्माण होईल. स्वच्छ जिल्ह्यांच्या यादीत सिंधुदुर्गखालोखाल बंगालचा नादिया, महाराष्ट्रातील सातारा, बंगालचा पूर्व मिदनापूर व महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वेक्षणात सर्वाधिक गुण ग्रामीण भागांत घरातील शौचालयांच्या स्वच्छतेला देण्यात आले. त्यानंतर शाळा व रुग्णालयात साठलेला कचरा व घाण पाण्याचे साठे इत्यादींचे निरीक्षण करून गुण देण्यात आले.ग्रामीण स्वच्छतेत बंगाल १२ व्या, गुजराथ १४ व्या तर महाराष्ट्र १५ व्या क्रमांकावर आहे. देशातले सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश २६ व्या तर बिहार सर्वात शेवटच्या ३१ व्या क्रमांकावर आहे.
सिंधुदुर्ग सर्वात स्वच्छ जिल्हा
By admin | Published: September 09, 2016 5:23 AM