वैभववाडी (सिंधुदुर्ग) : तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून करुळ आणि भुईबावडा दोन्ही घाटमार्ग काही काळ ठप्प होते. करुळ घाटातील वाहतुक तात्काळ सुरळीत करण्यात सार्वजनिक बांधकामला यश आले. तर भुईबावडा घाटातून छोट्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरु केली आहे. तर भुईबावडा घाटातील रस्ता एका जागी खचला आहे. एडगाव फौजदारवाडी येथील पुलावर पाणी आल्यामुळे वैभववाडी उंबर्डे मार्ग तासभर ठप्प होता. खांबाळे मधलीवाडीत आणि करुळ जामदारवाडीत घरावर वीज कोसळली. त्यामुळे अर्थिक नुकसान झाले. मात्र, सुदैवाने घरातील कुणालाही ईजा पोहोचली नाही. विजांच्या कडकडाटामुळे सलग दुस-या दिवशी खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरा सुरळीत झाला.
सायंकाळी चारच्या सुमारास विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी सायंकाळी खंडित झालेला वीज पुरवठा रविवारी दुपारी दीड सुरु झाला होता. सायंकाळी पाऊस सुरु होताच पुन्हा वीज गायब झाली. त्यामुळे बाजारपेठील व्यवहारांवर परिणाम दिसून आला.
तालुक्याच्या सर्व भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सायंकाळी पाचच्या सुमारास करुळ आणि भुईबावडा घाटात दरडी कोसळल्या होत्या. त्याप्रमाणे भुईबावडा घाटातील रस्त्याची संरक्षण भिंतही खचली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने करुळ घाटातील दरडीची दगडमाती हटवून साडेसहाच्या सुमारास वाहतूक सुरु केली. घाटातील गटारे व नाले गाळाने भरल्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरुन वाहत होते.
भुईबावडा घाटात दरड कोसळून मार्ग पुर्णपणे बंद झाला होता. करुळ घाटातील वाहतूक सुरळीत केल्यानंतर भुईबावडा घाटातील दरडीचा काही भाग हटवून छोट्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरु केली आहे. उर्वरित दरड सोमवारी सकाळी हटवली जाईल, असे बांधकाम विभागाने स्पष्ट केले.एडगाव फौजदार येथील पुलावर करुळच्या सुकनदीचे पाणी आल्यामुळे वैभववाडी उंबर्डे मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प होती. पाण्याचा प्रवाह कमी कमी झाल्यावर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.
खांबाळे मधलीवाडी येथील आनंदी सदाशिव गुरव यांच्या घरावर वीज कोसळली. त्यामुळे घराच्या भिंतीला भगदाड पडले. तर घरातील वायरींग पुर्णपणे जळाले. तसेच करुळ जामदारवाडी येथील अरुण यशवंत पांचाळ यांच्या घरावरही वीज कोसळून पत्र्यासह घरातील विद्युत उपकरणे जळून खाक झाली. मात्र, सुदैवाने घरातील कुणालाही ईजा झालेली नाही. रात्री उशिरा वैभववाडी शहरासह परिसराचा वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र, ग्रामीण भाग अंधारात होता.
-करुळ घाटातील दरडी जेसीबीद्वारे हटवून बांधकाम विभागाने तातडीने वाहतूक सुरळीत केली.
-पावसामुळे भुईबावडा घाटातील रस्त्याची संरक्षण भिंतही खचली आहे.
-येथे पुलावर पाणी आल्यामुळे वैभववाडी उंबर्डे मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प होती.