सावंतवाडी, दि. 23 - आंबोली घाटातील रस्ता पूर्णतः कोसळल्याची माहिती पसरवणारी पोस्ट मंगळवारपासून (22 ऑगस्ट) सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र असे काहीही झालेले नसून आंबोली घाट पूर्णतः सुरक्षित आहे, त्यामुळे अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी केले आहे. आंबोली घाट कोसळला असल्यानं रस्ता बंद करण्यात आला आहे, अशी अफवा मंगळवारी रात्रीपासून सोशल मीडियावर फिरत आहे. या अफवेमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र सोशल मीडियाद्वारे फिरणा-या अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी केले आहे.
हा मेसेज सोशल मीडियावर आल्यानंतर पुणे, कोल्हापूर बेळगावातून कोकणात प्रवास करणा-यांनी जवळच्या नातेवाईकांना तसेच मित्रांना फोन करुन खरंच घाटातील रस्ता कोसळला आहे का?, याची खात्री करत होते व त्यानंतरच घराबाहेर पडत होते. काहींनी तर आंबोली घाट रस्त्याऐवजी दुस-या मार्गाची निवड केली. दरम्यान, सोशल मीडियावर आंबोली घाटाबाबतच्या पोस्ट फिरू लागल्यानंतर पोलिसांनी बुधवारी (23 ऑगस्ट ) सकाळी संपूर्ण आंबोली घाट रस्त्याची पाहणी केली. यावेळी घाटातील एकही दगड कोसळला नसल्याचे आढळून आले. घाटाची पाहणी केल्यानंतर पोलीस उप-अधीक्षक दयानंद गवस यांनी आंबोली घाटात रस्ता कोसळल्याची अफवाच असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, अफवा पसरवणा-या व्यक्तीचा शोध घेणार असल्याचे गवस यांनी यावेळी सांगितले.