Sindhutai Sapkal Passed Away: 'अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या ७४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका खासगी त्यांच्यावर उपचार सुरू होते. २४ डिसेंबर रोजी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, सिंधुताईंवर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताईंचा आजवरचा प्रवास अतिशय खडतर होता. परंतु त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलेल्या एका आठवणीनं सर्वांचेच डोळे पाणावले.
"जगा पुढे जा, पण मागे वळून पाहा. एक लक्षात ठेवा. फुलांच्या पायघड्यांवरुन चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. काट्यांना फक्त बोचणं माहित असतं, वेदना माहित नसतात. या रस्त्यानं चालायचं असेल तर तुम्ही तुमचे पाय इतके मजबूत करा की एक दिवस ते काटे तुम्हाला सांगतील सुस्वागतम," असं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान बोलताना सल्ला दिला होता.
"मी स्मशानात राहणारी, जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाणारी, भिकाऱ्यांसोबत राहणारी मी, जन्म दिलेल्या बाळाची १६ वेळा दगड मारून नाळ तोडताना एकच विचार केला होता की सिंधुताई सपकाळ अशी वेळ कोणावर येऊ नये आणि आली तर तिच्यासोबत तू असली पाहिजे," अशी आठवणही त्यांनी सांगितली होती. "भूक लागल्यावर दुसऱ्यांच्या भूकेपर्यंत पोहोच म्हणजे तुझी भूक कमी होईल, असाही विचार केला होता," असं त्यांनी सांगितलं होतं.
खंत बाळगू नका जगायला शिका, असा सल्लाही त्यांनी सर्वांना दिला होता. "मी २२ देशांमध्ये जाऊन आले. कधी नऊवारीतली मी २२ देशांत जाईन असं वाटलंही नव्हतं. शिका पुढे जात राहा, पण मागेही वळून पाहात राहा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. गरीबी वाईट असते परंतु गरीबांपर्यंत पोहोचा," असाही सल्ला त्यांनी दिला होता.