Sindhutai Sapkal Passed Away: 'अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या ७४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका खासगी त्यांच्यावर उपचार सुरू होते. २४ डिसेंबर रोजी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, सिंधुताईंवर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सिंधुताई यांचा आजपर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर होता. त्यांच्या आईवडिलांना मुलगी नको होती, म्हणून त्यांनी त्यांचं नाव चिंधी असं ठेवलं होतं. सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्ध्यात झाला. गाव लहान असल्यानं सुविधांचा अभाव आणि इतर कारणांमुळं सिंधुताई यांचे फक्त चौथीपर्यंत शिक्षण झाले होते. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचं लग्नही झालं. वयाने २६ वर्षांनी मोठे असलेले श्रीहरी सपकाळ यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
त्यांचा संघर्ष लग्नानंतरही कायम राहीला. नवऱ्यानं घेतलेल्या संशयानंतर त्यांना गावानंही वाळीत टाकलं. आयुष्यातल्याच संघर्षानं सिंधुताई या समाजसेवेकडे वळल्या. अनाथ मुलांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी त्यांनी १९९४ मध्ये पुरंदर तालुक्यात कुंभारवळण गावात ममता बाल सदन या संस्थेची स्थापना केली. या ठिकाणी सिंधुताईंनी अनाथ मुलांना आसरा दिला. अनेकांना त्यांनी आपल्या पायावर उभं करून आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर योग्य जोडीदार सोधून त्यांनी मुलांची लग्नही लावून दिली.
सिंधूताई यांनी बाल निकेतन हडपसर, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृह, अभिमान बाल भवन. गोपिका गाईरक्षण केंद्र. ममता बाल सदन, सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन न शिक्षण संस्था अशा अनेक संस्था सुरू केल्या.
गाईच्या गोठ्यात मुलीचा जन्मजन्मापासूनच सिंधुताईंना मोठा संघर्ष करावा लागला. नवऱ्यानं घराबाहेर काढल्यानंतर सिंधुताईंनी गाईच्या गोठ्यात मुलीला जन्म दिला. तिची दगडानं तोडलेली नाळ आणि मुलीचा टाहो त्या अखेरपर्यंत विसरल्या नाहीत. लहान बाळ हाती घेऊन त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. माईंनी आपल्या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय निधीही मिळावा म्हणून 'मदर ग्लोबल फाऊंडेशन'ची स्थापनाही केली. त्यांच्या जीवनावर आधारीत 'मी सिंधुताई सपकाळ' हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता.
अनेक पुरस्कारांच्या मानकरीमहाराष्ट्र सरकारकडून त्यांना २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्याआधी २०१० साली त्यांना महाराष्ट्र सरकारच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई यांना जवळपास ७५० आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.