महाराष्ट्रातील तरूणांना अधिक उत्तम दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या सिंगापूर दौऱ्यादरम्यान इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्निकल एज्युकेशन या तांत्रिक शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेला भेट दिली. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या संस्थेस भेट दिली होती. त्यांनी येथील सुविधांचे कौतुक केले होते. या भेटीदरम्यान लोढा सुमारे ४ तास या संस्थेमध्ये थांबले आणि या संस्थेबाबत सखोल माहिती मिळवली.
येथील तरुणांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण मिळते? कोणते नवीन तंत्रज्ञान येथे वापरले जाते? आपल्या तांत्रिक शिक्षणात आणि येथे उपलब्ध असलेल्या तांत्रिक शिक्षणात काय फरक आहे? या सर्व बाबींचा रीतसर अभ्यास त्यांनी केला. येथील सुविधा बघून आपण अतिशय प्रभावित झालो असून, नक्कीच महाराष्ट्रात देखील या सर्व गोष्टी लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ. त्यासाठी महाराष्ट्र सरकार येत्या काळात सामंजस्य करार देखील करेल असे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. कुशल मनुष्यबळाचे केंद्र म्हणून जागतिक स्तरावर भारताची ओळख निर्माण व्हावी, यासाठी सदर भेट अतिशय महत्वाची ठरणार आहे.
इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्निकल एज्युकेशन या तांत्रिक शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेमार्फत कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक असलेल्या इतर संस्थांना सर्वतोपरी सहाय्य केले जाते. २००३ सालापासून कार्यरत असलेल्या ITEES (Institute of Technical Education Education Services) या संस्थेमार्फत ३० देशांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण प्रदान करण्यासाठी सहकार्य केले गेले आहे. नवीन तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणारी सुविधा सुरु करायची असल्यास ITEES च्या माध्यमातून पायाभूत सुविधा विकास, आवश्यक व्यवस्थापन कौशल्य, अभ्यासक्रम तयार करणे इत्यादी प्रकारच्या सर्व आवश्यक विषयांबाबत सहकार्य मिळते.