मुंबई - लोकप्रिय गायिका वैशाली माडे (Vaishali Made) आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. 31 मार्चला वैशाली मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत. दुपारी 12 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, कला, साहित्य आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला याबाबत माहिती दिली आहे. वैशाली यांनी अनेक चित्रपटांत गाणी आणि मराठी मालिकांची 'टायटल साँग' देखील गायली आहेत.
मराठी बिग बॉसमुळे वैशाली माडे चर्चेत आल्या होत्या. त्यात त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्या पक्षप्रवेश करणार आहेत. गायिका वैशाली माडे या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहेत. 'झी' वरील मराठी आणि हिंदी अशा दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद वैशाली यांनी पटकावलं आहे. महाराष्ट्रासह देशभरात त्यांचे असंख्य फॅन्स आहेत.
वैशाली माडे 2008 मध्ये 'झी मराठी'च्या 'सा रे ग म प'च्या पर्वाच्या विजेत्या ठरल्या आहेत आणि हाच त्यांच्या आयुष्याचा 'टर्निंग पाँईंट' ठरला. त्यानंतर 'झी'च्या हिंदी 'सा रे ग म प'मध्ये ही त्यांनी आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर बाजी मारली. माडे यांचा एका सुप्रसिद्ध गायिकेपर्यंतचा प्रवास संघर्षासह अनेक चढ-उतारांचा राहिला आहे. आता त्या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत गायिका म्हणून सुप्रसिद्ध आहेत.