एकच चर्चा ; मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंचा फोन बारामतीला, की उपमुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीला ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:07 PM2019-10-25T13:07:10+5:302019-10-25T13:14:24+5:30
शिवसेनेने आधीच भाजपला 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र निवडून आलेल्या जागा पाहता, भाजप उपमुख्यमंत्री पद देण्यास राजी होईल अशी शक्यता आहे.
- रवींद्र देशमुख
मुंबई - विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही एका पक्षाला कौल दिला नाही. त्यामुळे कोणताही पक्ष एकट्याने सरकार स्थापनेचा दावा करू शकत नाही. अशा स्थितीत दोन किंवा तीन पक्षांना एकत्र येऊन सत्तास्थापनेसाठी दावा करावा लागणार आहे. यात आता शिवसेनेला चांगलीच डिमांड आली आहे.
2014 मध्ये लागलेल्या निकालाप्रमाणेच हा निकाल असून यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या जागा घटल्या आहे. तर विरोधी पक्षावर जनतेचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. गेल्यावेळी भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दाखवल्यामुळे शिवसेनेची किंमत झटक्यात कमी झाली होती. अशा स्थितीत भाजपने सरकार स्थापन केले होते. तर शिवसेना विरोधी बाकावर बसली होती. मात्र भाजपने हिंदूत्ववादी विचारसरणी म्हणून शिवसेनेला सोबत घेतले. परंतु, सबंध पाच वर्षे सत्तेत शिवसेनाला सावत्र भावाची वागणूक मिळाली. त्यामुळे शिवसेनेना सत्तेत असून पाच वर्षे विरोधकांच्या भूमिकेत दिसली.
दरम्यान नुकत्याच लागलेल्या विधानसभा निकालात शिवसेना आणि भाजपला काही जागांचे नुकसान झाले. मात्र युतीला सत्तास्थापनेसाठी हव्या असलेल्या जागा उभय पक्षांना मिळाल्या आहेत. आता भाजपसोबत गेल्यास शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार हे निश्चित आहे. मात्र सेनेच्या महत्त्वकांक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत काँग्रेसने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊ केली आहे. राज्य पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी संदर्भातील महत्त्वाचे निर्णय शरद पवार यांच्याकडेच सोपविण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्याच्या निर्णयात पवारच मुख्य भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे बारामती पुन्हा एकदा चर्चेत येणार असं दिसत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद अशा दोन ऑफर आहेत. त्यातील मुख्यमंत्रीपदाची ऑफर घेण्यासाठी त्यांना बारामतीला फोन करावा लागणार आहे. तर उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांना भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना दिल्लीत फोन करावा लागणार आहे. आता उद्धव बारामतीला फोन लावणार की, दिल्लाला असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चीला जात आहे.
शिवसेनेने आधीच भाजपला 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र निवडून आलेल्या जागा पाहता, भाजप उपमुख्यमंत्री पद देण्यास राजी होईल अशी शक्यता आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.