मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दहावीतील विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी इंग्रजी (द्वितीय/ तृतीय भाषा), गणित (भाग १/ २)साठी बहुसंची प्रश्नपत्रिकांऐवजी एकच प्रश्नपत्रिका पुरविण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आल्यावर, हे आदेश राज्य शिक्षण मंडळाकडून सर्व विभागीय सचिवांना दिले आहेत. त्यासाठी शिक्षण मंडळाने परिपत्रक काढले असून, यासंबंधी सर्व सूचना विभागीय मंडळाने केंद्र संचालक, मुख्याध्यापक, परीक्षक, परीरक्षक, नियामक यांना देऊन त्यासंबंधी कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे म्हटले आहे.
दहावीचा पुनर्रचित अभ्यासक्रम हा कृतींवर आधारित आहे. अभ्यासातील ज्ञानरचनावाद परीक्षेतही यावा, या उद्देशाने राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यामुळे सध्या दहावीच्या परीक्षेसाठी तयार होत असलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये आकलन, उपयोजन, रसग्रहण अभिव्यक्ती विकास यावर आधारित प्रश्नांचा समावेश असणार आहे.
एकूणच पुस्तकातील व पुस्तकाबाहेरील आव्हानात्मक प्रश्न विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. त्यानुसार, काही विषयतज्ज्ञांनी बहुसंची प्रश्नपत्रिका मुलांना देण्याची आवश्यकता नाही, असे अभिप्राय बालभारतीकडे दिले होते. त्यानुसार, मंडळातर्फे २०१९च्या माध्यमिक शालान्त परीक्षेपासून पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे.