लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ११०१० अप पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस या गाडीचा ठाणे रेल्वे स्थानकावरील ‘आॅपरेशनल थांबा’ ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत वाढविण्यात आला आहे. गेल्या सव्वा वर्षात प्रत्येक तीन महिन्याला मध्य रेल्वे प्रशासन प्रसिद्धिपत्रक काढून या गाडीचा थांबा वाढवीत आहे. सव्वा वर्षात पाच वेळा प्रसिद्धिपत्रक काढून थांब्याची मुदत वाढविली आहे. असे किती दिवस करणार? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जातअसून, लालफितीत अडकलेल्या या गाडीच्या थांब्याला कधी हिरवा कंदील मिळणार? असा प्रश्नसुद्धा दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पडला आहे. हा थांबा अधिकृत व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल पाठपुरावा करीत आहेत. सिंहगड एक्स्प्रेस ही गाडी मुंबईहून पुण्याला जाताना ठाणे रेल्वे स्थानकावर थांबते; परंतु ही गाडी पुण्याहून मुंबईला जाताना ठाणे रेल्वे स्थानकात थांबत नव्हती. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाकडून १ एप्रिल २०१६ रोजी प्रसिद्धिपत्रक काढून या गाडीचा पुण्याहून मुंबईला जाताना ठाणे रेल्वे स्थानकावर ३० जून २०१६ पर्यंत आॅपरेशनल थांबा देण्यात आला होता. त्यानंतर तो वाढवून ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत करण्यात आला होता. पुन्हा तो वाढवून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत करण्यात आला होता. नवीन वर्षात तो कायम ठेवून ३१ मार्च २०१७ करण्यात आला होता आणि नंतर तो वाढवून ३० जून २०१७ पर्यंत वाढविण्यात आला होता. आता तो वाढवून ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत करण्यात आला आहे. प्रत्येक तीन महिन्याने ‘आॅपरेशनल थांबा’ वाढविण्यात आला त्याला आज सव्वा वर्ष झाले. असे अजून किती दिवस थांबणार? तो अधिकृत थांबा का होत नाही? लालफितीत तो का अडकला आहे? असा प्रश्न प्रवासी वर्गाला पडलाआहे. रेल्वे प्रशासनाने सिंहगड एक्स्प्रेसचा थांबा हा ‘आॅपरेशनल थांबा’ न ठेवता तो ‘अधिकृत थांबा’ ठेवला पाहिजे होता व तशी प्रसिद्धी रेल्वे प्रशासनाने देऊन प्रवाशांना कळविण्याचे गरजेचे होते; परंतु रेल्वे प्रशासन सिंहगड एक्स्पे्रस या गाडीचा पुण्याहून मुंबईला जाताना अधिकृत थांबा न देऊन प्रवाशांवर अन्यायच करीत आहे.- पंकज ओसवाल, कर्जत
सिंहगड एक्स्प्रेसचा ठाण्याचा अधिकृत थांबा लालफितीत
By admin | Published: July 12, 2017 3:03 AM