पुणे, दि. 16 - सिंहगड घाटाच्या रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना अजूनही घडत असल्यामुळे खबरदारी म्हणून अजूनही हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. वनविभागाने याबाबत माहिती दिली. गेल्या 15 दिवसांमध्ये नऊ किलोमीटरच्या या घाटरस्त्यावर दोन वेळा दरड कोसळली आहे. दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी घाटरस्ता वाहतुकीला बंद केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आयआयटीच्या तज्ञांकडून तपासणी केली आहे. हा अहवाल येईपर्यंत घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे अशी माहिती वनविभागाने दिली.रविवारी 30 जुलै रोजी सिंहगडावर जाणाऱ्या घाटात सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली होती. त्यावेळी पर्यटकांना गडावरच थांबण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. नंतर रात्री उशिरा दगडांचा ढिगारा बाजूला केल्यानंतर सर्व पर्यटक सुरक्षित खाली उतरले. तेव्हापासून घाटरस्ता बंद ठेवण्यात आला आहे. सिंहगड घाट रस्ता : निधी असूनही दुरुस्ती नाही -सिंहगड घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षांपूर्वी वनविभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दीड कोटीहून अधिक रक्कम देऊनही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. येत्या आॅक्टोबर महिन्यात कामांची निविदा काढून, त्यानंतरच दुरुस्तीच्या कामास सुरुवात होणार आहे.सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळल्याने अनेक पर्यटक अडकले होते. गडावर जाण्या-येण्याच्या पायथ्यापासून ते गडापर्यंतचा रस्ता सध्या बंद ठेवण्यात आला आहे. सिंहगड रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम वनविभागाकडेच आहे; मात्र रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वनविभागाने १ कोटी ६१ लाख रुपये रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली होती. गेल्या दोन वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीची कामे केली नाही. दरड कोसळण्याची शक्यता असणाºया ठिकाणी जाळ्या लावल्या नाहीत. त्यामुळे गडावरील रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले दिसून येतात, असा दावा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे म्हणाले की, सिंहगडाच्या देखरेखीचे काम वनविभागाकडे आहे; मात्र रस्ता दुरुस्ती व इतर कामे करणे स्वत: शक्य नसल्याने वनविभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन वर्षांपूर्वी १ कोटी ६१ कोटी रुपयांची रक्कम दिली होती. ही रक्कम कोणत्या कामासाठी खर्च केली. याबाबतची माहिती व हिशेब सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेला नाही.सिंहगडाच्या रस्ते व इतर कामासाठी वनविभागाकडून आणखी दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे म्हणाले की, ९ किलोमीटर घाट रस्त्यापैकी केवळ २०० मीटर दरड प्रवण भागात जाळी बसविण्याचे काम केले जाणार आहे. निविदेस प्रतिसाद मिळाला नव्हता. इतर कामांसाठी गेल्या मार्च महिन्यात मंजुरी मिळाली आहे. सार्वजिक बांधकाम विभागातर्फे या कामांच्या निविदा ऑक्टोबरमध्ये काढून, त्यानंतर सुमारे ५ कोटी रकमेच्या कामास सुरुवात केली जाईल. दरड काढण्याचे काम वनविभागाकडून सुरू आहे.
आणखी वाचा-(रस्ता सिंहगडाचा; चाल मात्र कासवाची)