मुंबई, दि. 30 - मुसळधार पावसामुळे मंगळवारी मुंबईच्या विविध भागात पाणी साचले होते. आज सकाळी या पाण्याचा निचरा झाल्यानंतर हळूहळू नेमकी परिस्थिती समोर येत आहे. सायनच्या गांधी मार्केट परिसरात बंद कारमध्ये एका वकिलाचा मृतदेह सापडला आहे. प्रियम (३०) असे या वकिलाचे नाव आहे. दुपारी सायन पोलिसांना एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत कारमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी गाडीचा दरवाजा तोडून प्रियम यांना बाहेर काढले. त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पावसामुळे गाडीत अडकून पडल्याने गुदमरुन प्रियम यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रियम हा रात्री. 8.30 घरी आल्यावर त्याच्या मित्राने मोबाईल करुन मी पाण्यात फसलो आहे मला घ्यायला येतो का ? असे विचारले. मित्राला घ्यायला गेलेल्या प्रियमने मित्राला सुखरुप घरी पोहचवले. आणि तो घरी यायला निघाल्या नंतर सायन जवळ त्याची सँट्रो कार पाण्यातून काढतांना बंद पडली. काचा बंद आणि गाडी बंद झाल्याने सेंट्रल लॉकबंद झाल्याने बाहेर पडता आले नाही. त्यामुळे गुदमरून प्रियमचा मृत्यु झाला. मुंबईत कालच्या पावसाने अनेकांना 26 जुलै 2005 सालची आठवण करुन दिली. त्यावेळी सुद्धा अनेकांचा गाडीत अडकून पडल्याने मृत्यू झाला होता.
दुस-या एका घटनेत दिलीप कुमार सत्यनारायण झा यांचा पवई तलाव येथे पाण्यात घसरून पडल्याने बुडून दुर्देवी मृत्यू झाला. राजवाडी रुग्णालय येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तत्पूर्वी सकाळी बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकरही बेपत्ता आहेत. साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी उघड्या ठेवण्यात आलेल्या गटारातून अमरापूरकर वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, डॉ. अमरापूरकर गेल्या 18 तासांपासून बेपत्ता असून याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांना केवळ त्यांची छत्री सापडली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
डॉ.अमरापूरकर मंगळवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारात बॉम्बे हॉस्पिटलमधून प्रभादेवी परिसरातील आपल्या राहत्या घरी जाण्यासाठी निघाले होते.धक्कादायक म्हणजे, सकाळपर्यंतही ते घरी पोहोचले नसल्याची माहिती त्यांच्या जवळील नातेवाईकांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्रशासनाकडून परिसरातील गटार उघडी ठेवण्यात आली होती, या उघड्या गटारातूनच डॉ. दीपक अमरापूरकर वाहून गेल्याचे बोलले जात आहे.