मुंबई : साहेब, टपरीवर उभे असलेले दोन जण बॉम्बस्फोट होणार, असे बोलत असल्याच्या माहितीच्या कॉलने खळबळ उडाली. पोलिसांनी मुलुंड टोलनाका परिसर पिंजून काढला. मात्र, हाती काही लागले नाही. अखेर, कॉल करणाऱ्या दीपक कांबळे (३३) या तरुणाचा शोध घेत पोलिसांनी कारवाई केली. त्याने दारूच्या नशेत खोटी माहिती दिल्याचे समोर आले. दुसऱ्या घटनेत इंडियन मुजाहिदीनच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर फोन करून विमानतळ उडवण्याची धमकी देणाऱ्या इरफान शेख या मनोरुग्णाला पोलिसांनी अटक केली.
ठाणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ११२ क्रमांकाच्या हेल्पलाइनवर सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आलेल्या कॉलवर संबंधिताने मुलुंड चेकनाकाजवळील पानटपरीवर दोन व्यक्ती बॉम्बस्फोट होणार आहे, अशी चर्चा करत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या परिसरात शोध घेतला. मात्र काहीही संशयास्पद आढळून आले नाही. अखेर, पोलिसांनी मोबाइल लोकेशननुसार, मॉडेल चेकनाका येथील पार्किंगमधून कॉल करणाऱ्याला ताब्यात घेतले.
दीपक कांबळे नावाचा तरुण हा मूळचा सांगलीचा रहिवासी असून ठाण्यात राहतो. तो चालक म्हणून काम करतो. त्याने दारूच्या नशेत कॉल केल्याचे स्पष्ट होताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. साेमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विमानतळावर फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण इंडियन मुजाहिदीनशी संबंधित असल्याचे सांगत विमानतळ उडवण्याची धमकी दिली होती. १० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदीमुंबईत येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला गोवंडी येथून ताब्यात घेतले. चौकशीत तो असंबंध बडबडत होता. तो मनोरुग्ण असल्याने कुणीतरी त्याला फोन करण्यास भाग पाडले असावे का, या दृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत. यासंदर्भात उपायुक्त सिद्धार्थ गेडाम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत अधिक चौकशी करीत असून, आताच कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे होईल, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वीचे कॉल- गेल्या आठवड्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ईमेल आयडीवर गुरुवारी रात्री धमकीचा मेल आला.- धमकी देणाऱ्या व्यक्तीने तो स्वतः तालिबानी असल्याचा दावा करत तालिबानी संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीने हा आदेश दिला असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
धमकीचे २६ मेसेज -मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देत ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर धमकीचे तब्बल २६ मेसेज पाठवले होते. यामध्ये २६/११ सारखा हल्ला होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. कंट्रोल रूमच्या व्हॉट्सॲपवर पाकिस्तानी नंबरवरून या धमकीची माहिती देण्यात आली होती. दहशतवादी हल्ल्याच्या धमकीच्या मेसेज प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विरार परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतले होते.