- सतीश नांगरे, शित्तूर वारुण (जि. कोल्हापूर)
लष्करात जवान असलेल्या भावाला किडनी देऊन बहिणीने जीवनदान दिले. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने सुभाष माने आणि प्रेमाताई प्रकाश माने या भावंडांच्या अनोख्या प्रेमाची चर्चा सध्या परिसरात आहे.सुभाष महिपती माने हे खुजगाव (ता. शिराळा, जि. सांगली) या गावचे आहेत. वयाच्या २१ व्या वर्षी ते भारतीय सैन्यदलामध्ये दाखल झाले. सध्या ते युनिट ८ महार सिक्कीम येथे कार्यरत असून, ३१ डिसेंबर २०१५ ला केलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांना त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे कळले. किडनी प्रत्यारोपण करणे गरजेचे असल्याचे कळल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.अशावेळी बहीण प्रेमाताई त्यांच्यासाठी धावून आली. शित्तूर वारुण (ता. शाहूवाडी) येथील प्रकाश तुकाराम माने यांच्याशी प्रेमाताई यांचा सतरा वर्षांपूर्वी विवाह झाला. प्रेमाताई यांचं शिक्षण सातवीपर्यंत झालेलं आहे. सद्य:स्थितीमध्ये रक्ताच्या नात्यातीलच व्यक्ती हे किडनी दान करू शकतात. हे कळल्यानंतर माने दाम्पत्याने सुभाष माने यांच्यासाठी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दक्षिण कमांड हॉस्पिटल (एससी) पुणे येथे डॉ. एस. के. पांडा आणि डॉ. अमित अग्रवाल यांनी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया जूनमध्ये यशस्वीरीत्या पूर्ण केली. सध्या सुभाष आणि त्यांची बहीण प्रेमाताई हे दोघेही सुखरूप असून, दोन महिन्यांनंतर सुभाष हे आपल्या देशसेवेच्या कर्तव्यासाठी रुजू होणार आहेत.देशरक्षण महत्त्वाचे : प्रेमाताई मानेसुभाष हे माझे बंधू असले तरी ते देशाचे रक्षण करणारे एक सैनिक आहेत. आमच्या कुटुंबापेक्षा देशाचे रक्षण करण्याची त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी किडनी दान केल्याचा मला सार्थ अभिमान आहे.- प्रेमाताई माने