सतीश नांगरे
शित्तूर वारूण (जि. कोल्हापूर) --बहीण-भावाच्या नात्यावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक कथा आपण आजवर कथा-कादंबऱ्या, नाटिका, चित्रपटाच्या माध्यमातून वाचल्या-ऐकल्या अन् पाहिल्याही. अशीच बहीण-भावाच्या नाते-संबंधातील पैलू उलगडणारी एक प्रेरणादायी गोष्ट घडली आहे. लष्करात जवान असलेल्या भावाला किडनी देऊन बहिणीने जीवनदान दिले आहे. भाऊ सुभाष माने आणि बहीण प्रेमाताई प्रकाश माने यांच्या अनोख्या नात्याची ही कहाणी आहे. सुभाष महिपती माने हे खुजगाव (ता. शिराळा, जि. सांगली) या गावचे आहेत. आई-वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा त्यांचा परिवार. त्यांना एक मुलगा आहे. वयाच्या २१ व्या वर्षी ते भारतीय सैन्यदलामध्ये दाखल झाले. गेली १४ वर्षे ते भारतीय सैन्यदलामध्ये आपले कर्तव्य बजावत आहेत. सध्या ते युनिट ८ महार सिक्कीम येथे कार्यरत असून, ३१ डिसेंबर २०१५ ला केलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांना त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे कळले. किडनी प्रत्यारोपण करणे गरजेचे असल्याचे कळल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.अशावेळी त्यांची बहीण प्रेमाताई या आपल्या भावाच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या. अर्थात त्यांना हे बळ दिले ते त्यांच्या पतीने. कारण अवयवदान किंवा किडनीदानविषयी समाजामध्ये अजूनही कितीतरी गैरसमज असताना किडनी दानाचे धाडस करणे ही गोष्ट सोपी नव्हे. शित्तूर वारुण (ता. शाहूवाडी) येथील प्रकाश तुकाराम माने यांच्याशी प्रेमाताई यांचा सतरा वर्षांपूर्वी विवाह झाला. प्रेमाताई यांचं शिक्षण सातवीपर्यंत झालेलं आहे. सध्या त्यांचे वय ३० वर्षे असून, या दाम्पत्यास दोन मुले आहेत. मुलगा आठवीत, तर मुलगी सहावीत शिकते. प्रकाश यांना शेती अगदी नावापुरतीच आहे. त्यांचा फूटवेअरचा व्यवसाय असला तरी घरची परिस्थिती तशी साधारणच आहे.सद्य:स्थितीमध्ये रक्ताच्या नात्यातीलच व्यक्ती हे किडनीदान करू शकतात. हे कळल्यानंतर माने दाम्पत्याने सुभाष माने यांच्यासाठी किडनी दानाचा केलेला निर्धार हा खरोखरच प्रशंसनीय आहे. या प्रक्रियेमध्ये बराच वेळही जात असल्यामुळे दरम्यानच्या काळात आपल्या संसाराची वाताहत होईल की काय? याचीसुद्धा त्यांनी फिकीर केली नाही. जवान सुभाष माने यांना त्यांची बहीण प्रेमाताई माने यांनी आपली स्वत:ची डाव्या बाजूची किडनी देऊ करण्याचे ठरवले. त्यानंतर दक्षिण कमांड हॉस्पिटल (एससी) पुणे येथे डॉ. एस. के. पांडा आणि डॉ. अमित अग्रवाल यांनी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया दि. १ जून २०१६ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण केली. सध्या सुभाष आणि त्यांची बहीण प्रेमाताई हे दोघेही सुखरूप असून, दोन महिन्यांनंतर सुभाष हे आपल्या देशसेवेच्या कर्तव्यासाठी रुजू होऊ शकतात.रक्षाबंधनादिवशी बहीण भावाला राखी बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी भावावर सोपविते. ती जबाबदारी स्वीकारून भाऊ या दिवशी आपल्या बहिणीस भेटवस्तू देतो. मात्र, या रक्षाबंधनाच्यावेळी प्रेमातार्इंनी आपल्या भावासाठी आगळी-वेगळी भेट देऊन बहीण-भावाचे ऋणानुबंध आणखीनच घट्ट केले आहेत, असेच म्हणावे लागेल.‘भय्या मेरे राखी के बंधन को निभाना’ म्हणणाऱ्या बहिणींना प्रेमातार्इंनी भावाप्रती असणाऱ्या बहिणीच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. देशरक्षण महत्त्वाचे : प्रेमाताईसुभाष हे माझे बंधू असले तरी ते देशाचे रक्षण करणारे एक सैनिक आहेत. आमच्या कुटुंबापेक्षा देशाचे रक्षण करण्याची त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी किडनी दान केल्याचा मला सार्थ अभिमान असल्याचे प्रेमाताई माने यांनी सांगितले.