मुंबई - गोपीनाथ मुंडे यांचा घात की अपघात याच्या चौकशीबद्दल बोलल्यास आमच्या बहीणीला राग येतो, अशी टीका विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे. बीड लोकसभा मतदार संघातील शिरूर येथील सभेत ते बोलत होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेवर कडाडून टीका केली.
महाराष्ट्रातील राजकरणातील केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीची ठरत आहे. बीड लोकसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवार म्हणून प्रीतम मुंडे तर महाआघाडीच्या वतीने बंजरग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीड लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील महत्वाचा मतदारसंघ समजला जातो. भाजपचे जेष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुद्धा या मतदारसंघाचे नेतृत्व केलं आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून जरी महाआघाडी कडून सोनवणे यांना उमेदवारी मिळाली असली तरीही खरी लढत मुंडे विरोधात मुंडे अशी पहायला मिळत आहे. एकीकडे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे तर दुसरीकडे धनंजय मुंडे आहे. प्रत्येक सभेत दोन्ही एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सरू केलेली ऊसतोड महामंडळाचे काय झाले असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू घात की अपघात असा संशय सामान्य माणसाच्या मनात आहे. त्यामुळे, चौकशी करण्याबाबत मी मागणी केली तर आमच्या बहिणीला राग येतो असे म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाना साधला. तुम्ही सत्तेत आहे त्यामुळे लोकांच्या मनात संशय असेल तर तुम्ही चौकशी करावी अशी मागणी सुद्धा यावेळी धनजय मुंडे यांनी केली.