मुंबई : स्मार्ट सिटीबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. उद्धव ठाकरे यांनी आधी स्मार्ट सिटी योजनेला विरोध केला, परंतु मुख्यमंत्र्यांशी बोलणी झाल्यानंतर एका रात्रीत आपली भूमिका बदलत योजनेला पाठिंबा दिला. शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांमधील वाटाघाटी म्हणजे साटेलोटे असल्याची टीका, मुंबई कॉँग्रेस संजय निरुपम यांनी केली. आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना निरुपम म्हणाले की, ‘काही अटींवर स्मार्ट सिटीला पाठिंबा देत असल्याची घोषणा शिवसेनेने केली. यात ६० लाख भूमिपुत्रांना रोजगार देण्याची अट आहे. एकट्या मुंबईत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ६० लाख रोजगार कसे निर्माण करणार, हे शिवसेना आणि भाजपाने आधी स्पष्ट करावे. मुंबईत ‘लोअर परळ’मध्ये स्मार्ट सिटी उभारण्यात येणार आहे. केवळ उद्योजक, बडे बिल्डर व विकासक यांच्या फायद्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.’ ‘सरकार आणि बिल्डरांच्या या हातमिळवणीला काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेत कडाडून विरोध केला होता. आमचा विरोध अद्याप कायम आहे,’ असे निरुपम म्हणाले. (प्रतिनिधी)दरवाढ हा अन्यायच...मेट्रो दरवाढ हे भाजपा आणि रिलायन्सचे साटेलोटे आहे. मेट्रो अॅक्टच्या नावाखाली रिलायन्स नेहमी दरवाढ करते. हा मुंबईच्या जनतेवर होणारा अन्याय आहे.ही दरवाढ कायमची टळावी, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती निरुपम यांनी दिली.
शिवसेनेची दुटप्पी भूमिका
By admin | Published: December 17, 2015 2:32 AM