पुणो : आजारी भावाच्या देखभालीसाठी रात्री रुग्णालयात मुक्कामी गेलेल्या कोमल गुप्ता या दुर्घटनेत नशीब बलवत्तर म्हणून बचावल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी भावाकडे रुग्णालयात गेलेल्या कोमल या शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घरी परतल्या; मात्र परिसरात जमलेली गर्दी आणि काल उभी असलेली आणि रात्रीत कोसळलेली इमारतीच्या रडारोडय़ाचा ढीग पाहून त्यांना धक्काच बसला, या दुर्घटनेची काहीही माहिती नसल्याने तसेच या इमारतीत राहणारे आपले कोणी शेजारीही दिसत नसल्याचे गुप्ता यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळत होते. विशेष म्हणजे, कोमल यांचे पती आणि मुलगा सुटीमुळे इतर नातेवाइकांकडे गेले असल्याने ते दोघेही या दुर्घटनेतून बचावले आहेत.
कोमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या तीन महिन्यांपूर्वी कोमल या पती सुनील गुप्ता यांच्यासह या इमारतीत राहण्यास आल्या होत्या. त्याचे पती आणि लहान मुलगा सुटीनिमित्ताने आपल्या कोंढवा येथील नातेवाइकांकडे गेलेले होते, तर कोमल यांचा भाऊ सुरेश गोरे हे आजारी असल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे भावाच्या देखभालीसाठी आपण गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच रुग्णालयात गेलो असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच, घरी कोणीही नसल्याने त्या भावासोबतच रुग्णालयात राहिल्या, दुस:या दिवशी सकाळी पुन्हा घरी आल्यावर हे पाहून आपल्याला धक्काच बसल्याचे त्या म्हणाल्या. भावाची काही कागदपत्रे न्यायची होती म्हणून आपण आलो होते, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सकाळी या परिसरात आल्यानंतर काहीच सुचत नसल्याने जवळपास अर्धा तास कोमल या परिसरात आपल्या इमारतीमधील रहिवाशांना जवळपास अर्धा तास शोधत होत्या. अखेर इमारतीचा वॉचमन आणि काही ओळखीचे शेजारी दिसल्यानंतर, त्यांना हायसे वाटले. मात्र, घटनास्थळी असलेल्या कोमल या वारंवार कोसळलेल्या इमारतीकडे पाहत होत्या, तसतसे त्यांच्या डोळ्यातून अश्रू मात्र थांबताना दिसत नव्हते.
अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून व नागरिकांच्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर गावे समाविष्ट केली पाहिजेत, तरच अनधिकृत बाधकामे थाबतील. तसेच, अंदाधुंद चाललेल्या बांधकाम व्यवसायावर अंकुश राहील.
- दत्तत्रय धनकवडे, महापौर
ही दुर्घटना निंदनीय आहे. इमारत पडणो म्हणजे रहिवाशांच्या जिवाशी खेळ आहे. यावर गांभीर्याने विचार केला जाईल. तशा प्रकारचे नवीन कडक कायदे करणार आहोत. दुर्घटनाग्रस्तांना आवश्यक मदत देण्यात येत आहे.
- अनिल शिरोळे, खासदार