मुंबई : तळीराम चालकांना जरब बसावी आणि कठोर कारवाई करणे शक्य व्हावे यादृष्टीने मुंबई वाहतूक पोलिसांनी जीपीएस, कॅमेरासारख्या यंत्रणेसह नव्या ‘ब्रिद अॅनलायझर’ मशिन सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला अशा 60 मशिन वाहतूक पोलिसांकडे घेण्यात येतील. या मशिनमुळे वाहतूक पोलिसांकडे तळीराम चालकांच्या गुन्ह्यांची माहिती साठवून ठेवणे शक्य होईल. दारू पिऊन वाहन चालविणे हा गुन्हा असून, त्यामुळे अपघाताचा धोकाही संभवतो. त्याविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते. चालकांवर दंडात्मक कारवाई करताना समज दिली जाते. तर पुन्हा गुन्हा घडल्यास लायसन्स रद्दही केले जाते. नादुरुस्त होत असलेल्या सध्याच्या ब्रिद अॅनलायझर मशिन, त्यांना स्वतंत्र कॅमेरे असल्याने ते हाताळताना पोलिसांना होणारा मनस्ताप, त्याचप्रमाणे कधीकधी पोलिसांना मोबाइलमधूनच तळीराम चालकांचा काढावा लागणारा फोटो या सर्व कारणांमुळे नव्या अत्याधुनिक मशिन घेण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला. त्यानुसार सुरुवातीला एकूण 60 मशिन घेण्यात येतील. यातील 10 मशिन ताफ्यात दाखल झाल्या असून, आणखी 50 मशिन दोन ते तीन दिवसांत येणार आहेत. या मशिनला कॅमेरा, जीपीएस यंत्रणा जोडलेली असेल. त्याचप्रमाणे मशिन वाहतूक नियंत्रण कक्षाशीही जोडलेल्या असतील. त्यामुळे तळीराम चालकावर कारवाई करताना तत्काळ त्याचा फोटो काढून पोलिसांना माहितीचा साठा आपल्याकडे ठेवणे शक्य होईल. तर नियंत्रण कक्षाशी या मशिन जोडल्या गेल्याने होणाऱ्या कारवाईचे ठिकाणही समजेल. यापूर्वी गुन्ह्यांच्या माहितीचा साठा हाताने लिहून ठेवला जात असल्याने चालकावर कारवाई करताना त्याची संपूर्ण माहिती मिळविताना कठीण होत होते. मात्र या मशिनमुळे त्याच्या गुन्ह्यांची माहिती सहजपणे मिळेल. (प्रतिनिधी)
‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ला बसणार आळा
By admin | Published: October 15, 2016 4:45 AM