सावली/गेवरा (चंद्रपूर) : पाथरी वनविकास महामंडळाच्या नवेगाव उपक्षेत्रात रविवारी चार बछड्यांचा मृत्यू झाला, तर वाघीण बेपत्ता आहे. या वाघिणीच्या शोधासाठी वनविभाग व वनविकास महामंडळाच्या ४० कर्मचाऱ्यांची सहा पथके गस्त घालीत आहेत. मात्र, वाघिणीच्या शिकारीची शक्यता नाकारता येत नाही, असे खुद्द राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले, तसेच त्यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. ही चौकशी सीबीआय व वनविभागाच्या संयुक्त पथकाद्वारे केली जाणार आहे.या घटनेनंतर अपर प्रधान वनसंरक्षक व चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे सोमवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. ज्या ठिकाणी बछडे आढळले, त्या परिसरात वाघिणीचा माग काढण्यासाठी १८ कॅमेरे लावण्यात आले आहेत. रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरामध्ये वाघीण चित्रित झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ती वाघीण आहे की वाघ, याबाबत वनविभाग साशंक आहे. यापूर्वी तपासात सीबीआयची मदत झाली आहे. त्यामुळे सीबीआयकडे तपास सोपविण्यात आल्याचे मुनगंटीवार म्हणाले. पोलीस व वनविभागाचीही मदत होईल, असे ते म्हणाले. बछड्यांचे शवविच्छेदनसोमवारी दुपारी चंद्रपूर येथील रामबाग नर्सरीत चार बछड्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. या वेळी मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, विभागीय वनअधिकारी राजू धाबेकर, एएसएफ व्ही. डब्ल्यू. मोरे, एनटीसीएचे प्रतिनिधी बंडू धोतरे, पीसीसीएफचे प्रतिनिधी मुकेश भांदककर उपस्थित होते. दरम्यान, बछड्यांचा मृत्यू भुकेमुळे झाल्याचा अंदाज वर्तविला जात असला तरी नेमके कारण अहवालानंतरच कळेल.सतर्कतेचा इशाराचार बछड्यांचा मृत्यू झाल्याने वाघिणी चवताळण्याची शक्यता आहे. परिणामी, घटनास्थळाच्या परिसरातील गावात वनविभागाने दवंडी पिटून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.वाघाच्या हल्ल्यात महिला ठारचंद्रपूरमधील सावली वनपरिक्षेत्र सोमवारी दुपारी सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करून तिला ठार केले. शांताबाई गिरीधर भोयर (३६) असे मृत महिलेचे नाव असून, ती मेहा (बु.) येथील रहिवासी आहे.
बछड्यांच्या मृत्यूची एसआयटी चौकशी
By admin | Published: December 29, 2015 1:50 AM