मुंबई - अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत बोगस विद्यार्थी दाखवून त्या आधारे विशेष शिक्षकांची बोगस भरती करण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) येत्या दोन महिन्यांत करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत केली.या प्रकरणात कागदपत्रांची योग्य तपासणी न करता अथवा बनावट कागदपत्रांचा वापर करून जळगाव जिल्ह्यात भरती करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. सदस्य अजय चौधरी यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. उत्तरात तावडे यांनी सांगितले की, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणा-या शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत सामावून घेण्यासंदर्भात निर्णय २०१० मध्ये झाला आहे. या शासन निर्णयाद्वारे जिल्हा परिषद, जळगाव यांनी जून ते मार्च २०१७ अखेर एकूण १८१ विशेष शिक्षक व ८ परिचर यांना प्रत्यक्षात समायोजनाने पदस्थापित केलेले आहे. ग्राम विकास विभागामार्फत जून २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत विविध पत्रांद्वारे ९४ विशेष शिक्षक व ४ परिचर यांचे समायोजन करण्याबाबातची पत्रे जिल्हा परिषद कार्यालयास प्राप्त झाली आहेत. मात्र, ५ मे २०१७ नंतर कोणतेही पत्र प्राप्त झाले नसतानाही शिक्षक आणि कर्मचारी यांची भरती करण्यात आली आहे. ही भरती बनावट पत्रे व कागदपत्रांच्या सहाय्याने केली असल्याचे निदर्शनास आले असून, संबंधितांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहितीही तावडे यांनी दिली.
दिव्यांगांसाठीच्या शिक्षक भरतीची एसआयटी चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 3:29 AM