मुंबई : सन २००६ औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणात आरोपी असलेला लष्कर-ए-तोएबाचा दहशतवादी शेख अब्दुल नईम करीम याच्या हत्येचा तपास करण्यासाठी सीबीआय सहसंचालकांच्या (छत्तीसगड) अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचा आदेश सोमवारी उच्च न्यायालयाने दिला. नईमची आई कमार नसरीन करीम यांनी छत्तीसगड पोलिसांविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नईम आमच्या तावडीतून पसार झाला, असा दावा छत्तीसगड पोलिसांनी केला आहे. मात्र त्याच्या आईने नईमची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. कमार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. नरेश पाटील व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. नईम याची हत्या पोलिसांनीच केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयने कारावा, अशी मागणी कमार यांनी याचिकेद्वारे केली आहे.उच्च न्यायालयाने सीबीआय सहसंचालक (छत्तीसगड), छत्तीसगड महासंचालक, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल मुख्य एटीएस अधिकाऱ्यांची एसआयटी यांच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापण्याचा आदेश देत २४ आॅक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.औरंगाबादमध्ये राहणारा नईम २५ आॅगस्ट २०१४ रोजी पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात होता. त्याला हावडा-मुंबई एक्स्प्रेसने मुंबईत आणण्यात येत होते. याच दरम्यान तो पोलिसांच्या तावडीतून फरार झाला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र नईमच्या आईच्या म्हणण्यानुसार, नईमला किडनीचा आजार होता. त्यामुळे तो शारिरीकरित्या अत्यंत दुबळा झाला होता. या अवस्थेत तो पळू शकत नव्हता. नईमची हत्या करण्यात आली असावी किंवा त्याला कोठडीत बेकायदारीत्या ठेवण्यात आले असावे, अशी भीती कमार यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
आरोपीच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमा
By admin | Published: September 20, 2016 4:40 AM