जरांगेंची एसआयटी चौकशी; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 06:37 AM2024-02-28T06:37:07+5:302024-02-28T06:37:32+5:30
पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सभागृहात सुरुवात होताच भाजपचे आशिष शेलार यांनी जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबाबत केलेल्या विधानांचा विषय उपस्थित केला. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही हल्लाबाेल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठा आंदोलनातील हिंसक वक्तव्ये आणि हिंसक कृती यांची सखोल चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) करण्याचे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. ‘छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन आंदोलन करताना मायबहिणीच्या शिव्या द्यायच्या ही कोणती संस्कृती’, असा सवाल करीत, ‘मनोज जरांगे पाटलांशी मला घेणेदेणे नाही, पण त्या निमित्ताने जे काही घडत आहे त्याच्यामागील सूत्रधार कोण हे शोधावेच लागेल. कोण, काय-काय केले याची सगळी चौकशी करून षडयंत्र बाहेर काढले जाईल’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सभागृहात सुरुवात होताच भाजपचे आशिष शेलार यांनी जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबाबत केलेल्या विधानांचा विषय उपस्थित केला. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही हल्लाबाेल केला.
वॉररूम कोणी सुरू केल्या, पैसा कुठून आला?
मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी काय, काय केले हे समाजाला माहिती आहे. मला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. जे माझ्याबद्दल बोलले त्यांच्या पाठीशी नाही तर माझ्या पाठीशी समाज आहे. तरीही जरांगे यांच्याविषयी माझी तक्रार नाही.
पण, या सगळ्याच्या पाठीशी कोण आहे हे शोधावे लागेल. बोलविता धनी कोण ते शोधले जाईल. ते बोलले त्याची स्क्रिप्ट कुठून आली, नवी मुंबईत आंदोलनावेळी तिथे, छत्रपती संभाजीनगर अन् पुण्याला वॉररुम कोणी सुरू केल्या होत्या या सगळ्यांची चौकशी करावी लागेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अशांतता पसरवण्यासाठी
कोणी, कुठून पैसा पुरवला याची माहिती समोर येत आहे. आंदोलनस्थळी जरांगेंना परत कोणी आणून बसविले, कोणाकडे बैठकी झाल्या, दगडफेक करा असे कोणी सांगितले, बीडच्या घटनेत कोण होते हे सगळे समोर येईलच असे त्यांनी बजावले.
जरांगे यांची दिलगिरी
छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत दिलीगिरी व्यक्त केली आहे. कोणाचीही माय, बहीण काढणे योग्य नाही, असे नमूद करीत जरांगे यांनी ‘फडणवीस यांच्याबद्दल जे बोललो ती चूक झाली; याविषयी मी दिलगिरी व्यक्त करतो,’ अशा शब्दांत एक पाऊल मागे घेतले.
शरद पवार यांचा पाठिंबा घेतला नाही
मी शरद पवार यांचा पाठिंबा घेतला नाही. सहा महिन्यांत उपमुख्यमंत्री फडणवीसांविरुद्ध मी बोललो नाही. पण ते आता खुनशीपणाने वागत आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर त्यांनी एसपींना सांगून गुन्हे नोंदवायला लावले. अंतरवाली सराटी येथील गुन्हे परत घेतले नाहीत. यामुळे विरोधात बोललो. मी कोणत्याही राजकीय पक्ष अथवा नेत्यांच्या विरोधात आणि जवळचा नाही, असेही जरांगे म्हणाले.
...तर राजकारणातून संन्यास : राजेश टोपे
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी आपला कोणताही संबंध नाही. यात मी दोषी आढळलो तर राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान माजी मंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी विरोधकांना दिले आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे टोपे यांचा हात असल्याचा आरोप भाजपने केला होता. त्याला टोपे यांनी विधानभवनात माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले.