मुंबई : मी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) या पदावर असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे माझ्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, असा गौप्यस्फोट सीताराम कुंटे यांनी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात केल्याचे समोर आले आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही अशा यादीचा उल्लेख त्यांच्या जबाबात केला आहे.
कुंटे नोव्हेंबरमध्ये मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले. सध्या ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार आहेत. ईडीने अनिल देशमुख, त्यांचे पुत्र ऋषिकेश, सलील आणि इतर नऊ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ७ डिसेंबर २०२१ रोजी कुंटे यांनी ईडीसमोर दिलेल्या जबाबाचा तपशील दिला असून, त्यात या अनधिकृत यादीबाबतचा गौप्यस्फोट आहे.
त्यात सीताराम कुंटे यांनी सांगितले की, देशमुख हे गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे. त्यामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठल्या जागी आणि कोणत्या पदावर बदली करायची, हे नमूद केलेले असायचे. देशमुख यांचा स्वीय सहायक संजीव पालांडे याच्यामार्फत या अनधिकृत याद्या माझ्यापर्यंत पोहोचविल्या जात असत. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अधीन काम करीत असल्याने संबंधित याद्या स्वीकारण्यास नकार देऊ शकत नव्हतो. देशमुखांकडून आलेली यादी ही पोलीस आस्थापना मंडळाच्या सर्व सदस्यांना दाखविली जात असे. तसेच, ही यादी देशमुख यांच्याकडून आल्याचे मी मंडळाच्या सदस्यांना तोंडी सांगायचो. त्यामुळे पोलिसांच्या बदल्या करताना या नावांचा समावेश केला जायचा, असे कुंटे यांनी ‘ईडी’च्या चौकशीदरम्यान सांगितल्याचे समजते.