मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाचे चेंबूर नाका येथे ‘संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृह’ आहे. या वसतिगृहात रविवारी दुपारच्या जेवणात पाल आढळल्याने एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांनी जेवणाची सुरुवात करण्याआधीच हा प्रकार उघडकीस आल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्यावर होणारा विपरित परिणाम टळल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. राज्यातील विविध भागातून मुंबईत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह आहे. या वसतिगृहात सध्या एकूण १२० विद्यार्थी राहात आहेत. यामध्ये २० अंध आणि अपंग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रविवारी वसतिगृहात मांसाहारी जेवण असते. ठरल्याप्रमाणे आजही मासांहारी जेवण होते. उद्या परीक्षा असल्यामुळे या वसतिगृहात राहणारा विद्यार्थी राहुल जांबूळकर जेवायला लवकर गेला. सगळ््यात आधी हजेरी लावलेल्या राहुलने जेवण ताटात वाढून घेतल्यावर जेवणाची सुरुवात करण्याआधीच त्याच्या जेवणात पाल असल्याचे त्याला आढळले. त्याने तत्काळ ही माहिती अन्य विद्यार्थ्यांना दिली आणि वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती कळवली. वसतिगृहातील जेवणात पाल आढळल्याचे कळल्यावरही ठेकेदार संध्याकाळी वसतिगृहात दाखल झाला नव्हता. वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत पाहणी केली. या पाहणीनंतर विद्यार्थ्यांना कारवाईचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. यापूर्वीदेखील जेवणात अनेकदा काचा, खडे, माती आढळली आहे. या ठिकाणी स्वयंपाकघराची दुरवस्था झालेली आहे. गंजलेल्या वस्तू येथे आहेत. खिडक्यांची दारे तुटलेली आहेत. स्वच्छता येथे नसते. या प्रकारांमुळे विद्यार्थी कंटाळले आहेत. स्वच्छ जागेत अन्न शिजवावे, अशी मागणी अनेकदा केली आहे. या प्रकरणानंतर जेवणाचा कंत्राटदार बदलावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. जेवण निकृष्ट दर्जाचे असते, याबाबत गृहपाल, तसेच समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहे. मात्र, त्यांच्याकडून काहीही कारवाई होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. ‘याबाबत कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्यात येईल,’ असे सहायक आयुक्त अविनाश देवसटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वसतिगृहातील जेवणात आढळली पाल
By admin | Published: February 13, 2017 3:55 AM