ऑनलाइन लोकमतअकोला, दि. २१ : अकोला शहरापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या वाघागड हा निसर्गसंपन्न परिसर जिल्ह्यातील पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे. हिरवीगार वनराई, टुमदार टेकड्या आणि तलावांनी आच्छादलेला परिसर नागरीकांना आकृष्ट करीत आहे. सुटीच्या दिवशी वाघागड व महान धरण परिसरात जिल्ह्यातीलच नव्हेतर आजुबाजूच्या जिल्ह्यातील नागरीकांची सुद्धा मोठी गर्दी दिसून येते.
बार्शिटाकळी तालुक्यातील महानजवळ वाघागड हा निसर्गरम्य, हिरवा शालू पांघारलेला आणि छोट्या, मोठ्या टेकड्या असलेल्या परिसर पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. वाघागड येथे पुरातन गुप्तेश्वर महादेव संस्थान आहे. या मंदिराला तलावांनी वेधलेले असून, एका टेकडीवर मंदिर आहेत. वाघागड परिसराला खरी ओळख निर्माण करून दिली ती, वैकुंठवासी हभप जगदीश महाराज ठोकळ यांनी. त्यांच्याच प्रयत्नांनी या परिसराला वैभव प्राप्त झाले. गुप्तेश्वर महादेवाच्या दर्शनाला दुरदुरून भाविक येतात. गुप्तेश्वर महादेवासह परिसरात गंगा माता मंदिर, संत गजानन महाराज, संत वासुदेव महाराज यांची मंदिरे आहेत. मंदिरांचा परिसर तलावांनी आणि वृक्षराईने वेढलेला असल्याने, परिसराचे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
वाघागड परिसरामध्ये सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे. तलावात असलेले गंगा माता मंदिर आणि मंदिरातून तलावाचे दिसणारे अथांग पाणी भाविकांचे लक्ष वेधून घेतात. याठिकाणी मनाला अतिव शांतता लाभते. सुटीच्या दिवशी शेकडो भाविक कुटूंबासह याठिकाणी येतात. वाघागडला आल्यानंतर भाविक महान धरणाला भेट देतात. महान धरणाचा परिसर सुद्धा वनराईने नटलेला असून, धरणातून कोसळणारे पाणी एका ओढाद्वारे गावाकडे जाते. या ओढ्यामध्ये उतरून भाविक मौजमस्ती करताना दिसून येतात. वाघागड व महान परिसरात पर्यटकांची वाढत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना सुद्धा रोजगाराचे साधन मिळाले आहे. परिसरात विश्रामगृह असून, हॉटेल्स, भोजनावळ सुद्धा आहेत.