लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भायखळ्यातील महिला कारागृहातील कैदी मंजुळा गोविंद शेट्ट्ये (वय ३२) हिचा मृत्यू तुरुंगाधिकारी व सुरक्षारक्षकांनी केलेल्या मारहाणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी महिला तुरुंगाधिकारी मनीषा पोखरकरसह सहा जणांवर नागपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात महिला कारागृह रक्षक बिंदू निकाडे, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, वसीमा शेख व आरती शिंगारे इतरांची नावे असून, या सर्वांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे भायखळ्यातील अन्य महिला कैद्यांनी संतप्त होत, कारागृहात निषेध करीत तोडफोड व जाळपोळ केली होती. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पाच कैद्यांवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भावजयच्या खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली मंजुळा शेट्ट्ये हिला शुक्रवारी रात्री तुरुंगाधिकारी व अन्य रक्षकांनी बराकीमध्ये बेदम मारहाण केली होती. त्यामुळे बेशुद्धावस्थेत पडल्यानंतर, तिला जे.जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी तिला मृत घोषित करण्यात आले. प्रशासनाने सुरुवातीला मंजुळा हिला हृदयविकाराचा झटका आल्याचे इतर कैद्यांना सांगितले होते. मात्र, कारागृहात कच्ची कैदी मरियम शेख व अन्य कैद्यांनी मंजुळाला बेदम मारहाण झाल्याचे पाहिले होते. शनिवारी सकाळी त्यांनी ही बाब इतरांना सांगितल्यानंतर, सर्व जणींनी संतप्त होत कारागृहात आंदोलन सुरू केले. रक्षकांकडून त्यांना धमकाविण्याचा प्रकार सुरू झाल्यानंतर, त्यांनी टेबल, खुर्च्यांची मोडतोड करीत, एका इमारतीच्या टेरेसवर दाखल होत घोषणबाजी केली. कैद्यांच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने, अतिरिक्त पोलीसबळ मागवून त्यांना नियंत्रणात आणण्यात आले. त्यासाठी सौम्य लाठीमारही करण्यात आला.दरम्यान, मृत कैदी मंजुळा शेट्ट्ये हिच्या शवविच्छेदन अहवालात तिला विविध ठिकाणी झालेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, शनिवारी रात्री जेलचे महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी तुरुंगाधिकारी मनिषा पोखरकरसह पाच रक्षकांचे निलंबन केले. तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, शनिवारी मध्यरात्रीपर्यंत नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तुरुंगाधिकारी मनिषा पोखरकर व पाच रक्षकांविरुद्ध खून केल्याचा गुन्हा दाखल केल्याने, त्यांना कधीही अटक होऊ शकते, असे सांगण्यात आले.२०० महिला कैद्यांवरही गुन्हा-कैदी मंजुळा शेट्ट्ये हिच्या मृत्यूमुळे संतप्त होत, कारागृहात तोडफोड केल्याप्रकरणी २०० महिला कैद्यांविरुद्ध सरकारी कामकाजात अडथळा, दंगल, सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंजुळा हिच्या हत्येप्रकरणी तुरुंगाधिकारी पोखरकर व अन्य पाच जणांविरुद्ध, मारहाणीच्या घटनेची साक्षीदार असलेल्या वसिमा शेख हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, खुनाचा गुन्हा नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
जेलरसह सहा जणांवर हत्येचा गुन्हा
By admin | Published: June 26, 2017 2:53 AM