पिंपरी : सराफी दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील आरोपींना शिताफीने पकडण्याची यशस्वी कामगिरी चिंचवड पोलिसांनी केली. सुमारे २० जणांच्या ‘मामा’ नामक टोळीतील सहा आरोपींना अटक करण्यात आले. देहूरोड हद्दीत गुन्हे केल्याचे उघडकीस आलेने चार आरोपींना देहूरोड पोलिसांकडे वर्ग केले. उर्वरित आरोपी फरार झाले. सर्व आरोपी सराईत आहेत, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त (परिमंडल तीन) राम मांडुरके यांनी पत्रकार परिषदेत दिली. तपास पथकातील पोलीस नाईक शांताराम हांडे, पोलीस शिपाई विष्णू भारती यांना दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीची माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनायक साळुंके, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांनी दोन पथके तयार करून दरोड्याच्या टोळीतील आरोपींना जेरबंद केले. प्रेमलोक पार्क येथे पडिक बंगल्याच्या ठिकाणी अंधारात थांबलेल्या या टोळीला पोलीस पथकाने पकडले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे, कोयता, चाकू, कटावनी, कापडी मास्क, नायलॉन रस्सी दोन दुचाकी असा एकूण एक लाख ६५ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. आकाश ऊर्फ मामा उत्तम रणदिवे (वय २६, रा. वेताळनगर), रुपेश ऊर्फ संतोष सुरेश पाटील(रा.लांडेवाडी भोसरी), ज्ञानेश्वर ऊर्फ ज्ञान्या भानुदास जगताप (वय ३२, वेताळनगर), रमेश ऊर्फ आण्णा खाजप्पा अहिवळे (वय २०,भूमकर चौक, वाकड),चंद्रकांत ऊर्फ चंद्या अनंत माने (वय २४,रा.वेताळनगर, चिंचवड), रफिक ऊर्फ काळ्या सलीम शेख (वय २४, रा.वेताळनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. टोळीचा सूत्रधार आकाश ऊर्फ मामा असून, तो सराईत आहे. (वार्ताहर)
दरोड्याच्या तयारीतील सहा आरोपी जेरबंद
By admin | Published: November 03, 2016 1:38 AM