भंडारा : शहरातील बाबा मस्तानशा वॉर्डात गोमांस विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या ठिकाणी छापा घालून सहा जणांना अटक करुन अडीच लाखांचे साहित्य जप्त केले. ही कारवाई आज दुपारी करण्यात आली. कमरअली हफीजअली सय्यद, सय्यद बाबुअली सय्यद, सय्यद आबीदअली रा. बैरागीवाडा, मो. बशीर कुरैशी अब्दुल रहेमान कुरैशी, मो. फिरोज व मो बशीर हाजी कुरैशी असे अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींचे नावे आहेत.बाबा मस्तानशा वॉर्ड परिसरातील बैरागीवाडा येथे काही इसम गोहत्या करुन मांस विक्री करीत होते. मागील काही दिवसांपासून येथे हा प्रकार सुरु होता. याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर यांना मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात त्यांनी कत्तलखान्यावर छापा घातला. यात कमरअली हफीजअली सय्यद, सय्यद बाबुअली सय्यद, सय्यद आबीदअली रा. बैरागीवाडा, मो. बशीर कुरैशी अब्दुल रहेमान कुरैशी, मो. फिरोज व मो बशीर हाजी कुरैशी हे बैरागीवाड्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी गौहत्या करुन मांस विक्री करित असल्याचे आढळून आले.या कारवाईत त्यांच्याजवळून ४० किलो गौमांस, सहा जिवंत जनावरे, एक चारचाकी वाहन (क्र. एम एच ३६/६५६), मांस कटाईचे साहित्य असे एकूण २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुध्द भंडारा पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ अन्वये दोन वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर, प्रितीलाल रहांगडाले, अरुण झंझाड, वामन ठाकरे, सुधीर मडामे, रोशन गजभिये, बबन अतकरी, अनुप वालदे, मनोज अंबादे आदीनी केली आहे. (प्रतिनिधी)
गोमांस विक्री करताना सहा अटकेत
By admin | Published: March 13, 2017 4:12 AM