सिंधुदुर्गनगरी : किरकोळ कारणावरून एकाचा खून करून साडेआठ वर्षे फरार असलेला आरोपी कृष्णा हनुमंत चव्हाण (२९) याला सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. शनिवारी दुपारी ३ वाजता चव्हाण याला बंगलोरमधील घरातून ताब्यात घेण्यात आले.कृष्णा चव्हाण हा काही वर्षांपूर्वी आपल्या आई-वडिलांसोबत कामानिमित्त सिंधुदुर्गात आला होता. कुडाळ येथे आबा मुंज यांच्या ट्रकवर तो चालक होता. तर क्लीनर म्हणून बाबूराव पालव (२८) हा त्याच्यासोबत होता. चव्हाण हा चिरे आणण्यासाठी मालवण तालुक्यातील असरोंडी येथे ट्रक घेऊन गेला होता. त्याच्यासोबत पालव हाही होता. रस्त्यात ट्रकचा टायर पंक्चर झाला. हे पंक्चर काढण्यावरून कृष्णा चव्हाण व पालव यांच्यात किरकोळ भांडण झाले. रागाच्या भरात कृष्णाने ट्रकमधील व्हील पाना पालव याच्या डोक्यावर मारला. त्यात पालव जागीच ठार झाला. २६ मार्च २००६ रोजी दुपारी २.३० वाजता हा प्रकार घडला होता. त्यानंतर कृष्णा फरार झाला होता. (प्रतिनिधी)
फरार आरोपी साडेआठ वर्षांनी गजाआड
By admin | Published: September 22, 2014 2:16 AM