मुंबई : दुष्काळ आणि त्यावरील उपाययोजना यावर विधानसभेत विरोधकांनी आणलेल्या प्रस्तावावरील चर्चेकडे सहा मंत्र्यांनी पाठ फिरवली. विरोधकांनी ही बाब अध्यक्षांच्या लक्षात आणून देताच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मंत्र्यांना तातडीने सभागृहात हजर होण्याचे आदेश दिले. विरोधकांच्या घोषणाबाजीनंतर अध्यक्षांनी कामकाज काही काळ तहकूब केले.संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी गैरहजर मंत्र्यांना बोलवण्यासाठी अधिकारी पाठवले. सभागृहात हजर असणाऱ्या गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांना, तुम्ही इकडे असताना काय बोलत होता आठवते का, असा सवाल विरोधकांनी केला. सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही. विभागवार बैठका बंद खोलीत घेतल्या गेल्या, मोबाइलवर सूचना दिल्या. अशाने दुष्काळ कसा दूर होणार, अशी टीका थोरात यांनी केली. टँकर बंद करायचे असतील तर पीकपद्धतीत आमुलाग्र बदल करावे लागतील. त्या त्या भागाची भौगोलिक परिस्थिती पाहून कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे मत अजित पवार यांनी मांडले. दुष्काळावरील चर्चा उद्याही होईल.कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत, रोजगार हमी मंत्री जयदत्त क्षीरसागर या नव्या मंत्र्यांसह मदत व पुर्नवसन मंत्री सुभाष देशमुख, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे मंत्री सभागृहात नव्हते.
दुष्काळावरील चर्चेला जलसंधारणसह सहा मंत्र्यांची दांडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 2:59 AM