औरंगाबाद, दि. १० : मराठवाड्यातील सहा मंडळांमध्ये परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी झाल्याची नोंद विभागीय प्रशासनाने घेतली आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी मंडळात ६७ मि.मी, हिंगोलीतील वसमत मंडळात ७२ मि.मी., नांदेड जिल्ह्यातील मुदेखडमध्ये ७० मि.मी. तर कंधार तालुक्यातील पेठवडज मंडळात ७२ मि.मी.आणि मुक्रमाबाद मंडळात ७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्यातील अंधोरी मंडळात ६६ मि.मी पाऊस झाला.
विभागाचे एकूण पर्जन्यमान ७७९ मि.मी. इतकी आहे. सरासरीच्या तुलनेत ६२३ मि.मी. इतका पाऊस झाल्याचे विभागीय प्रशासनाने कळविले आहे. अपेक्षित पावसाच्या ८४ टक्के पाऊस यंदा मराठवाड्यात झाल्याचा दावा हवामान खात्याच्या विश्लेषणानुसार विभागीय प्रशासनाने केला आहे. ९० टक्के पर्जन्यमानाच्या पुढे जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद हे जिल्हे सरकले आहेत. तर औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड हे जिल्हे ६५ ते ८१ टक्क्यांच्या आत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, सोयगांव, खुलताबाद, कन्नड तालुक्यांत आजपर्यंत कमी पाऊस झाला आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील भोकर, उमरी, लोहा, किनवट, माहूर, हिमायतनगर, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव तालुक्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. बीडमधील परळी तालुक्यात कमी पावसाची नोंद झाली आहे. हिंगोलीतील कळमनुरी, वसमत तर परभणी जिल्ह्यातील परभणी शहर, पालम, गंगाखेड, पाथरी तालुक्यात कमी पाऊस झाला आहे.
३२ तालुक्यांत पावसाची अपेक्षामराठवाड्यातील ७६ पैकी ३२ तालुक्यांत ७० ते ८० मि.मी.च्या आत पाऊस झाला आहे. या तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावणे अपेक्षित आहे. औरंगाबोदतील ५, जालन्यातील ४, परभणीतील ४, हिंगोलीतील ३, नांदेडमधील ५, बीडमधील ५, लातूरमधील ४, तर उस्मानाबादमधील २ तालुक्यांत दमदार पावसाची अपेक्षा आहे.