मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील प्रत्येकी तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जबाजारीपण, नापिकी व दुष्काळ ही त्यांच्या आत्महत्येची कारणे आहेत. यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यात दगडथर येथील अशोक रामराव जटाळे (२९) यांनी गुरुवारी विष प्राशन केले. त्यांच्याकडे आठ एकर कोरडवाहू जमीन असून, त्यांच्यावर राष्ट्रीयीकृत बँकेचे ९० हजार रुपयांचे कर्ज आहे. चंद्रपूर सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव येथील दिलीप कामडी यांनी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सेलडोह येथील मंगेश रामाजी राऊत (२८) यांनी गुरुवारी शेतात विष प्राशन केले. मराठवाड्यात प्रभाकर गणपतराव खांडे (६५, मच्छिंद्रनाथ चिंचोली, जि. जालना), कौतिकराव आनंदा ठाले (३७, वाडी बु., जि. जालना) आणि पुंडलिक मरीबा गवलवाड (५५, कोळनूर, जि. नांदेड) यांनी आत्महत्या केली. खांडे यांना तीन एकर शेती आहे. दरवर्षी शेतात खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, अशी त्यांची स्थिती होती. त्यांच्यावर ५० हजार रुपये कर्ज आहे. भोकरदन तालुक्यातील वाडी बु. येथील कौतिकराव यांच्यावर ३ लाखांचे कर्ज होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. पुंडलिक गवलवाड यांच्या नावावर ३५ हजार रुपयांचे पीक कर्ज होते़ त्याचे नूतनीकरण करण्यासाठी त्यांनी खासगी सावकाराकडूनही कर्ज काढले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
राज्यात सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Published: August 29, 2015 1:25 AM