गणेश मापारी/ऑनलाइन लोकमतखामगाव, (जि.बुलडाणा), दि. 28 - शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वशिक्षा अभियानामार्फत विशेष कार्यक़्रम हाती घेण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात ६ ते १४ या वयोगटातील ६०० मुले शाळाबाह्य असल्याचे उजेडात आल्याने या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्यात आगामी तीन वर्षांमध्ये ६ ते १४ या वयोगटातील एकही मुलं शाळाबाह्य राहणार नाही. यासाठी शासनाने शिक्षण विभागाला विशेष कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. सन २०१६-१७ मध्ये राज्यातील ६८ हजार शाळाबाह्य मुलांना त्यांच्या वयानुरूप नियमित शाळेमध्ये दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शाळाबाह्य मुलांची अद्ययन पातळी इतर मुलांसारखी आणण्यासाठी शाळेच्या एक तास अगोदर आणि शाळेनंतर एक तास नंतर अशा पद्धतीनं शाळाबाह्य विद्यार्थ्यांना यापूर्वी प्रशिक्षण दिल्या जात होते. मात्र शाळाबाह्य मुलेसुद्धा वर्गातील अन्य मुलांसोबत शिकले पाहिजे. तसेच त्यांना वाचनाची सवय लावण्यासोबतच त्यांचा भाषा विकास जलदगतीने झाला पाहिजे, यासाठी आता अशा विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत दाखल केल्या जात आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला असता ६०३ मुले शाळाबाह्य असल्याचे समोर आले आहे. खामगाव तालुक्यात सर्वाधिक २०४ मुले शाळाबाह्य असून संग्रामपूर तालुक्यात सुध्दा १४२ मुले शाळाबाह्य आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळाबाह्य मुलांच्या शैक्षणिक साहित्याची व्यवस्था सर्वशिक्षा अभियान अंतर्गत करण्यात येत असून त्यांना नजीकच्या शाळेत प्रवेश दिल्या जात आहे. मेहकर, देऊळगाव राजा मध्येही ९ विद्यार्थी शाळाबाह्य४राज्यात एकही मुल शाळाबाह्य राहणार नाही यासाठी राज्यशासन संवेदनशिल आहे. राज्यशासनाने जुलै २०१६ मध्ये काढलेल्या परिपत्रकात बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर आणि देऊळगाव राजा या दोन तालुक्यांमध्ये एकही मुल शाळाबाह्य नसल्याचा उल्लेख केला आहे. परंतु सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार या दोन तालुक्यात सुध्दा ६ ते १४ वयोगटातील ९ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत.शाळाबाह्य मुलांची तालुकानिहाय संख्या४सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनाने केंद्राला ५ शैक्षणिक कार्यक्रमाची वचनबध्दता दिली आहे. त्यानुसार राज्यातील किमान ५ हजार प्राथमिक शिक्षकांना स्पोकन इंग्रजीमध्ये तर २५ हजार प्राथमिक शिक्षकांना गणित विषयात प्रगल्भ करण्याचे कार्य सुरू आहेत. जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देण्याचा कार्यक़्रम वर्षभर अविरतपणे सुरु आहे. जिल्ह्यात एकही मुल शाळाबाह्य राहू नये, यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत.- एन. के. देशमुख, शिक्षणाधिकारी (प्राथ.) बुलडाणा
जिल्ह्यात सहाशे मुले शाळाबाह्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2016 7:29 PM