ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 29 - वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवासाठी राज्यभरातून भाविक पुण्यात येतात. तसेच शहराच्या आसपासच्या गावांमधील नागरिकही मोठया प्रमाणात येतात. या भाविकांनी रात्री उशीरा पर्यंत गणेशोत्सवाचा आनंद घेतल्यानंतर त्यांना परत आपल्या गावी जाता यावे यासाठी पीएमपी प्रशासनाने कंबर कसली असून या वर्षी गणेशोत्सवाच्या शेवटाच्या आठ दिवसात पीएमपीकडून प्रतिदिवशी तब्बल 622 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. नियमित गाडयां व्यक्तीरिक्त या जादा गाडया असणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या कर्मचा-यांच्या सुटटयाही प्रशसनाने रद्द केलेल्या आहेत. येत्या 8 ते 15 सप्टेंबर दरम्यान, शहरातील प्रमुख 13 डेपोंमधून या जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
गणेशोत्सवासाठी शहराच्या उपनगरांमधून तसेच हददी जवळील गावांमधून मोठया प्रमाणात भाविक येतात.रात्री उशीरा पर्यंत देखावे सुरू असल्याने हे भाविकही रात्री थांबतात.मात्र, त्यानंतर त्यांना परत जाण्यासाठी वाहनांची सुविधा नसल्याने त्यांना सकाळ पर्यंत बसची वाट पाहत थांबावे लागते. त्यामुळे रात्री 10 पासूनच भाविकांना परत जाण्यासाठी या जादा गाडया सोडण्यात येणार आहेत. या जादा गाडयांना रात्री 11 वाजे पर्यंत नियमित तिकीट राहणार असून रात्री 11 नंतर तिकिटात 25 टक्के वाढ असणार आहे. तर रात्री 12 नंतर या जादागाडयांसाठी कोणतेही पास चालणार नाहीत. त्यामुळे भाविकांना तिकिट काढूनच प्रवास करावा लागणार आहे.
मागणीनुसार गाडया वाढविणार
पीएमपीकडून सर्व प्रमुख 13 डेपोंमधून या जादा गाडया सोडण्यात येणार आहेत. त्यासाठीचे नियोजन प्रशासनाने पूर्ण केले असून त्या बाबतच्या सूचना सर्व डेपो प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, गाडीला असलेली गर्दी तसेच प्रवाशांकडून केल्या जाणा-या मागणीनुसार, या गाडया सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी 20 पेक्षा अधिक प्रवाशांनी मागणी केल्यानंतर गाडी उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रामुख्याने पीएमपीच्या हददीबाहेरील मार्गांसाठी ही जादा गाडयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी आवश्यकतेनुसार, चालक आणि वाहकांच्या सुटटयांही रद्द करण़्यात आल्या असून त्यांच्या वेळेचे नियोजन करण़्यात आले आहे.