मुंबई : ज्या बांधकाम प्रकल्पांची पूर्ण होण्याची तारीख, सुधारित समाप्ती तारीख व विस्तारित समाप्ती तारीख १५ एप्रिल २०२१ किंवा त्यानंतर समाप्त होत असेल, अशा बांधकाम प्रकल्पांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. १५ एप्रिलपूर्वी मुदत संपणाऱ्या प्रकल्पांना ही मुदतवाढ लागू होणार नसल्याचे या आदेशात म्हटले आहे.रेराच्या या निर्णयामुळे विविध आव्हाने झेलणाऱ्या बांधकाम क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबद्दल नारेडकोचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी म्हणाले की, दुसऱ्या लॉकडाऊनमुळे बांधकाम क्षेत्रावर परिणाम झाला होता, त्यामुळे बांधकाम प्रकल्पांना मुदतवाढ मिळावी असे विविध संघटनांचे म्हणणे होते. दुसऱ्या लाटेत बांधकाम मजुरांचे स्थलांतर, बांधकाम साहित्याची दरवाढ यामुळे अनेक बांधकाम प्रकल्पांवर मोठा परिणाम झाला होता. बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ अशोक मोहनानी यांनी सांगितले की, दुसऱ्या लाटेचा राज्यातील शेकडो बांधकाम प्रकल्पांवर परिणाम झाला होता. या मुदतवाढीमुळे बांधकाम प्रकल्पांवरील कमी झालेला कामगार वर्ग पुन्हा जोडण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे भविष्यात बांधकाम व्यवसायिकांना होणारे नुकसान टाळण्यासदेखील मदत होईल. क्रेडाईचे सचिव प्रीतम चिवुकुला यांनी सांगितले की, महारेराच्या या निर्णयामुळे अडचणीत सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला पुन्हा एकदा उभारी घेण्यास मोठी मदत मिळणार आहे. मागील काही महिन्यांमध्ये प्रगतीपथावर असणाऱ्या बांधकाम क्षेत्राला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हे मुदतवाढीचे सहा महिने बांधकाम क्षेत्राला बळकटी देणारे ठरतील.
महारेराची राज्यातील बांधकाम प्रकल्पांना सहा महिन्यांची मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 8:39 AM